सासवड, (पुणे) : लग्नानंतर हुंड्यासाठी पैशांची व चारचाकीची मागणी करून मानसिक व शारीरिक छळ तसेच चारित्र्यावर संशय घेऊन दोन वेळा गर्भपात करण्यास भाग पाडल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत 33 वर्षीय विवाहितेने पतीसह सासू-सासऱ्यांविरोधात सासवड पोलिसांत तक्रार दिली आहे.

याबाबत धनश्री निलेश भोसले (वय-33, सध्या रा. सासवड, ता. पुरंदर, जि. पुणे) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार पती निलेश अरविंद भोसले, सासरे अरविंद धर्माजी भोसले आणि सासू सुलभा अरविंद भोसले अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धनश्री भोसले यांचा विवाह 24 मे 2020 रोजी निलेश अरविंद भोसले यांच्याशी हिंदू रितीरिवाजाप्रमाणे झाला. विवाहापूर्वी ‘तुमचं आमचं जमलं’ या विवाहविषयक संकेतस्थळाच्या माध्यमातून दोघांची ओळख झाली होती. विवाहानंतर काही दिवसांतच पती निलेश भोसले तसेच सासरे अरविंद भोसले व सासू सुलभा भोसले यांनी टोमणे मारण्यास सुरुवात केल्याचा आरोप विवाहितेने केला आहे.

‘तुला स्वयंपाक करता येत नाही’, ‘तू दिसायला चांगली नाहीस’, ‘तुझ्या वडिलांनी लग्न लहान केले’, ‘मानपान केला नाही’ अशा शब्दांत वारंवार अपमान केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर ऑगस्ट 2020 मध्ये सासरे अरविंद भोसले यांनी पती-पत्नीला घराबाहेर काढल्याचा आरोप असून, त्यानंतर दोघे भाड्याच्या खोलीत स्वतंत्र राहत होते. सप्टेंबर 2020 मध्ये गर्भधारणा झाल्यानंतर आर्थिक परिस्थितीचे कारण सांगून पतीने डॉक्टरांच्या सल्ल्याने गर्भपात करण्यास सांगितल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
त्यानंतर एप्रिल २०२१ मध्ये पुन्हा गर्भधारणा झाल्यानंतर पती व सासरच्या मंडळींनी मानसिक व भावनिक दबाव टाकून गर्भपात करण्यास भाग पाडल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. 6 जुलै 2021 रोजी पतीने आपल्या इच्छेविरुद्ध सातारा येथील लोकमान्य नर्सिंगहोममध्ये कॉपर-टी बसविल्याचा आरोपही विवाहितेने केला आहे.
तसेच पती आपल्यावर चारित्र्याचा संशय घेत असल्याने वारंवार वाद होत होते. या वादातून शिवीगाळ, दमदाटी आणि मारहाण करण्यात येत असल्याचे तक्रारीत नमूद आहे. पतीने व्यवसायासाठी माहेरून पैसे आणण्याची मागणी केल्याचा, तसेच सासरच्या मंडळींनी चारचाकी वाहनाची मागणी केल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
सासरे आपल्याला ‘तुला मुलं होणार नाहीत, तुझी पत्रिका मी पाहिली आहे’, असे म्हणत अपमानित करत असल्याचेही फिर्यादीने सांगितले आहे. अखेर या त्रासाला कंटाळून 27 नोव्हेंबर 2021 रोजी आपल्याला घरातून हाकलून दिल्याचा आरोप असून, त्यानंतर त्या माहेरी सासवड येथे आई-वडिलांसोबत राहत आहेत.
दरम्यान, पती निलेश भोसले यांनी त्यांच्या विरोधात घटस्फोटाची केस दाखल केली असून, ती सध्या पुणे कौटुंबिक न्यायालयात न्यायप्रविष्ट असल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी धनश्री भोसले यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी पती, सासू, सासरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास महिला हवालदार भुजबळ करीत आहेत.







