आदित्य बोराटे –

पुणे : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील इंदापूर येथील टेंभुर्णी नाक्याजवळ नायलॉन मांजामुळे दुचाकीस्वाराच्या गळ्याला गंभीर दुखापत झाल्याची घटना शनिवारी (दि. ८) घडली. उत्तम कदम (रा. सरडेवाडी) असे जखमी दुचाकीस्वाराचे नाव आहे. त्यांच्या गळ्यासह हातालाही दुखापत झाली असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुदैवाने त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.

कदम हे दुचाकीवरून सरडेवाडीहून इंदापूरच्या दिशेने येत होते. टेंभुर्णी नाक्याजवळ रस्त्यावर लोंबकळत असलेला धारदार मांजा अचानक त्यांच्या गळ्याला अडकला. प्रसंगावधान राखत त्यांनी मांजा हाताने बाजूला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, या वेळी मांजामुळे त्यांच्या गळ्याला आणि हाताला जखम होऊन रक्तस्राव झाला. त्यानंतर त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर शहर परिसरात पतंग उडविण्याचे प्रमाण वाढत असताना नायलॉन व चिनी मांजाचा वापर नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण करणारा ठरत आहे. रस्त्यांवर लोंबकळणाऱ्या मांजामुळे दुचाकीस्वारांसह पादचारी आणि पक्ष्यांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे प्रतिबंधित मांजाची विक्री व वापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
दरम्यान, चिनी व नायलॉन मांजाच्या विक्रीवर बंदी असून, स्थानिक व्यापाऱ्यांना याबाबत नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. प्रतिबंधित मांजा विक्री अथवा वापर करताना कोणी आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा इंदापूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रमेश ढगे यांनी दिला आहे.







