मुंबई : मुंबई उच्च न्यायालयातील लिपिक पदासाठी 16 ऑगस्ट रोजी पार पडलेली संगणक टायपिंग परीक्षा अखेर प्रशासनाकडून रद्द करण्यात आली आहे. परीक्षा केंद्रांवर झालेल्या मोठ्या तांत्रिक बिघाडामुळे आणि विद्यार्थ्यांच्या तीव्र आंदोलनानंतर हा निर्णय घेण्यात आला. या परीक्षेची नवीन तारीख व सुधारित वेळापत्रक लवकरच अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केले जाणार आहे.

16 ऑगस्ट रोजी आयोजित या परीक्षेत राज्यभरातील अनेक केंद्रांवर सर्व्हर बंद पडणे, की-बोर्ड व माऊस अचानक बंद होणे आणि सिस्टीम आपोआप लॉगआउट होणे अशा गंभीर समस्या निर्माण झाल्या होत्या. कल्याण, छत्रपती संभाजीनगर, वाशीम आणि नांदेड या केंद्रांवर तर सॉफ्टवेअरमधील त्रुटींमुळे परीक्षा सुरू झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच उमेदवारांना नापास दाखवले गेले. या प्रकारामुळे परीक्षार्थींमध्ये प्रचंड असंतोष पसरला होता.

या अन्यायाविरोधात संतप्त विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रांबाहेर एकत्र येत फेरपरीक्षेच्या मागणीसाठी निदर्शने केली. सीजेपीचे नेते अभिजीत दीपके यांनी छत्रपती संभाजीनगर येथे जाऊन विद्यार्थ्यांची भेट घेतली आणि ठिय्या आंदोलनात सहभाग नोंदवला. दुसरीकडे, आमदार रोहित पवार यांनी उच्च न्यायालयाचे महानिबंधक मुनगंटे साहेब व महाधिवक्ता मिलिंद साठे साहेब यांची प्रत्यक्ष भेट घेऊन ही टायपिंग टेस्ट रद्द करण्याची मागणी केली होती.

सुरवातीला प्रशासनाने परीक्षा सुरळीत पार पडल्याचे सांगितले होते, मात्र विद्यार्थ्यांचा रोष आणि लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा पाहून हायकोर्ट प्रशासनाने या तक्रारींची गांभीर्याने पाहणी केली. अखेर तांत्रिक बाबींचा विचार करून 16 ऑगस्ट ची ही परीक्षा रद्द करण्याचा अधिकृत निर्णय घेण्यात आला.
या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, झालेल्या गोंधळाची निष्पक्ष चौकशी व्हावी आणि आगामी टायपिंग परीक्षा पूर्णपणे पारदर्शक व स्वतंत्र वातावरणात पार पाडली जावी, अशी अपेक्षा उमेदवारांकडून व्यक्त केली जात आहे.






