मुंबई : बदलापूर येथील बोराडपाडा धबधब्यावर पर्यटनासाठी गेलेल्या एका 19 वर्षीय तरुणीचा पाण्यात बुडून दुर्दैवी अंत झाला. सांजली अश्वजीत मैत्रक असे या मृत तरुणीचे नाव असून, ती उल्हासनगरच्या कॅम्प 4 परिसरातील सुभाष टेकडी येथील रहिवासी होती. सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी ती आपल्या मित्रांसोबत या निसर्गरम्य ठिकाणी आली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, धबधब्याच्या परिसरात फिरत असताना अचानक सांजलीचा पाय घसरला आणि ती थेट खोल पाण्यात कोसळली. पोहणे येत नसल्यामुळे तिला पाण्याचा अंदाज आला नाही आणि ती बुडू लागली. सोबत असलेल्या मित्रांनी तिला वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु पाण्याचा प्रवाह आणि खोली जास्त असल्याने तिचा बुडून मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस व बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेऊन तिचा मृतदेह बाहेर काढला.

सांजली विठ्ठलवाडी येथील वेदांत कॉलेजमध्ये बी.कॉमच्या दुसऱ्या वर्षात (S.Y. B.Com) शिक्षण घेत होती. तिचे वडील अश्वजीत मैत्रक हे उल्हासनगरातील बहुजन हिताय विद्यार्थी वसतिगृहात अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत. ऐन तरुण वयात मुलीचा असा अचानक झालेला मृत्यू ऐकून मैत्रक कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

पावसाळ्यात बदलापूर आणि आसपासच्या परिसरातील धबधब्यांवर पर्यटकांची मोठी गर्दी असते. मात्र, सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्यामुळे अशा जीवघेण्या दुर्घटना घडत आहेत. या घटनेमुळे उल्हासनगर आणि बदलापूर परिसरात सर्वत्र तीव्र हळहळ व्यक्त केली जात असून, पर्यटकांनी धबधब्यांच्या ठिकाणी योग्य ती खबरदारी बाळगावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.







