पुणे : शाळेतून आनंदाने घरी परतलेला एक अल्पवयीन विद्यार्थी अवघ्या काही वेळातच काळाच्या पडद्याआड गेल्याची हृदयद्रावक घटना दिघी परिसरात घडली आहे. मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या एका 14 वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून दुर्दैवी अंत झाला. अश्वित अनिल भोसले (वय 14, रा. गजानन महाराज नगर, दिघी) असे या मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे.

अश्वित हा दिघी येथील रामचंद्र गायकवाड विद्यालयात इयत्ता नववीमध्ये शिक्षण घेत होता. शनिवारी सकाळी शाळा सुटल्यानंतर तो नेहमीप्रमाणे नेहमीच्या उत्साहात घरी आला. त्यानंतर सकाळी 10 च्या सुमारास तो घरामागे असलेल्या स्थानिक तलावावर मित्रांसोबत पोहण्यासाठी गेला. पाण्यात उतरल्यानंतर अश्वितला पाण्याच्या खोलीचा अचूक अंदाज आला नाही आणि तो हळूहळू खोल पाण्यात बुडू लागला. आपल्या मित्राला बुडताना पाहून त्याच्यासोबत असलेल्या इतर लहान मुलांनी घाबरून मोठ्याने आरडाओरडा सुरू केला.

त्याच वेळी तलावाच्या काठावर कपडे धुण्यासाठी आलेल्या काही महिलांच्या हे लक्षात आले. मुलांचा आक्रोष ऐकून त्यांनी न घाबरता परिस्थितीचे गांभीर्य ओळखले आणि लगेचच पोलिसांना फोन करून घटनेची कल्पना दिली. माहिती मिळताच अग्निशमन दल आणि स्थानिक पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्यात शोधमोहीम राबवून अश्वितला बाहेर काढले. त्याला तत्काळ पिंपरीतील यशवंतराव चव्हाण स्मृती (YCM) रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून उपचारापूर्वीच मृत घोषित केले. एका हसत्या-खेळत्या विद्यार्थ्याचा असा अचानक अंत झाल्याने भोसले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे






