पुणे: पुण्यातील गणेशोत्सवाला यंदा डीजेच्या दणदणाटामुळे वेगळे वळण मिळाले आहे. गणेशोत्सवासाठी मंडळांकडून जोरदार तयारी सुरू असतानाच डीजेच्या आवाजावरून वाद निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी पुण्यातील गणेशोत्सवाच्या बदलत्या स्वरूपावर भाष्य करत अभिनेत्री आणि नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाचा मुद्दा उपस्थित केला आहे.

गणेशोत्सव हा पुण्याच्या सांस्कृतिक आणि पारंपरिक ओळखीचा भाग आहे. मात्र, या उत्सवाचे स्वरूप हळूहळू बदलत असून पारंपरिक मिरवणुकीऐवजी मोठ्या आवाजातील डीजे आणि मनोरंजनाच्या कार्यक्रमांना अधिक महत्त्व मिळत असल्याची भूमिका मेधा कुलकर्णी यांनी मांडली. पुण्यातील सुमारे २०० गणेश मंडळांनी डीजेचा वापर न करण्याची भूमिका घेतली असल्याचे त्यांनी सांगितले.

मात्र, एका संस्थेने गणेशोत्सवाच्या कार्यक्रमासाठी गौतमी पाटील हिला बोलावल्याचा मुद्दा मेधा कुलकर्णी यांनी उपस्थित केला. गणेशोत्सवाच्या पारंपरिक आणि धार्मिक स्वरूपाऐवजी उत्सवाचे रूप अशा प्रकारच्या मनोरंजनाच्या कार्यक्रमांकडे वळणे योग्य नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे गौतमी पाटीलचा कार्यक्रम हा पुण्यातील गणेशोत्सवाच्या बदलत्या स्वरूपाच्या चर्चेतील महत्त्वाचा मुद्दा ठरला आहे.

गणेशोत्सवात अश्लील गाणी, मोठ्या आवाजातील संगीत आणि मिरवणुकांमुळे होणारी वाहतूक कोंडी यावरही कुलकर्णी यांनी आक्षेप घेतला. ध्वनिप्रदूषणासंदर्भातील न्यायालयीन निर्देश सर्वांसाठी समान असून गणेश मंडळांनाही त्यांचे पालन करावे लागेल, असे त्यांनी सांगितले.
उत्सव साजरा करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, मात्र त्याचा इतर नागरिकांना त्रास होऊ नये, याची काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे, असे कुलकर्णी यांनी म्हटले. आजच्या धांगडधिंग्यापेक्षा प्रबोधनात्मक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना प्राधान्य दिले पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली. त्यामुळे गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचा मुद्दा यंदाच्या पुण्यातील गणेशोत्सवाच्या चर्चेत चांगलाच केंद्रस्थानी आला आहे.







