पुणे: पुण्यातील बिबवेवाडी परिसरात तरुणाला टोळक्याने बेदम मारहाण करून तीक्ष्ण शस्त्राने गंभीर जखमी केल्याची घटना समोर आली आहे. ‘भावेश मोरे हा आमचा भाई आहे, त्याच्याशी तू वाद का घालतोस?’ असे म्हणत आरोपींनी तरुणावर हल्ला केल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून, अन्य साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

साक्षर महेश अडागळे (वय २५, रा. मीनाताई ठाकरे वसाहत, गुलटेकडी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अथर्व ऊर्फ साई शिंदे (वय २०) आणि राहुल ख्याडगी (वय १९, दोघे रा. शिवतेजनगर, अपर बिबवेवाडी) यांना अटक केली आहे. मोहन जीवन विद्यासागर, केदार ऊर्फ सोन्या क्षीरसागर, ओमकार राहुल अडागळे आणि समर्थ गरड यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना २७ ऑगस्ट रोजी रात्री दीडच्या सुमारास बिबवेवाडीतील समर्थनगर परिसरात घडली. साक्षर अडागळे हा आपल्या मित्र शंतून गायकवाडच्या घरासमोर गप्पा मारत थांबला होता. शंतून घरी गेल्यानंतर साक्षरही गाडी घेऊन घरी जाण्याच्या तयारीत होता. त्याचवेळी साई शिंदे आणि त्याचे साथीदार तेथे आले.

आरोपींनी साक्षरला शिवीगाळ करत भावेश मोरे याच्याशी वाद का घालतोस, असा जाब विचारला. त्यानंतर त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. साई शिंदे याने हातातील शस्त्राने साक्षरच्या डोक्यात वार केला. इतर साथीदारांनीही त्याला मारहाण केली.
आरडाओरड ऐकून शंतूनची आई साक्षरला सोडवण्यासाठी आली. मात्र आरोपींनी तिलाही शिवीगाळ करून धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्यानंतर साक्षर तेथून पळून मित्राच्या घरी गेला. त्यानंतर त्याला भारती रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय तपासणीत डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे समोर आले. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक शरयू देशमुख करत आहेत.







