संदीप टूले
केडगाव : दौंड तालुक्यातील खुटबाव येथे यवत पोलिसांनी महिला चालवत असलेल्या गावठी दारूभट्टीवर छापा टाकत १ लाख २६ हजारांचा माल जागीच पेटवून नष्ट केला. यासंदर्भात यवत पोलिसांना माहिती मिळाली होती. त्यानुसार, ही कारवाई करण्यात आली.
खुटबाव परिसरातील मेहेर टुरिझमच्या पाठीमागे माटोबा तलावाच्या कडेला दोन महिला दारू व्यवसाय करत असल्याची माहिती पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत मिळाली होती. ही माहिती समजताच शनिवारी (दि.२३) यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी पोलीस पथक तात्काळ संबंधित ठिकाणी कारवाईसाठी पाठवले. यावेळी पोलिसांनी आरोपी कमला निर्दोष नानावत (वय ५५, रा. गिरमेवस्ती खुटबाव, ता.दौंड, जि.पुणे), श्रीदेवी चंदरदेव गुडदावत (वय ४५, रा. गिरमे वस्ती खुटबाव) यांना ताब्यात घेतले.
पोलिसांना घटनास्थळी ५ हजार लिटरचे कच्चे रसायन, १०५ लिटर गावठी हातभट्टी इतका मुद्देमाल सापडला. पोलिसांनी संबंधित मालावर कारवाई करत दारूच्या ड्रमसह सर्व माल जागेवरच पेटवून दिला. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक उत्तम कांबळे, हवालदार रामदास जगताप, मोहन चांदणे, अक्षय यादव, प्रमोद शिंदे, उमेश गायकवाड, अजित इंगवले, प्रतीक्षा हांडगे यांनी केली.