उरुळी कांचन, (पुणे) : घराजवळ पार्किंग केलेली महिंद्रा कंपनीची पिकअप गाडी अज्ञात चोरट्यांनी किराणा मालासह चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या चोरीत पिकअप आणि त्यामधील किराणा माल असा एकूण सुमारे 9 लाख 50 हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. शनिवारी (ता. 07) रात्री आठ ते रविवारी (ता. 09) सकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली.

संदीप श्रीमंत गवळी (वय 24, सध्या रा. कांचन पार्क, उरुळी कांचन, ता. हवेली, मूळ रा. हिंगणी, ता. बार्शी, जि. सोलापूर) यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप गवळी हे आठवडे बाजारात किराणा दुकान लावून व्यवसाय करतात. किराणा मालाच्या वाहतुकीसाठी त्यांनी 2 फेब्रुवारी 2026 रोजी महिंद्रा कंपनीची पिकअप (क्र. एमएच 12 झेडई 0297) नवीन खरेदी केली होती. शनिवारी सकाळी त्यांनी विजय ट्रेडर्स येथून किराणा माल खरेदी करून पिकअपमध्ये भरला. त्यानंतर गोसावी वस्ती येथे गाडी पार्क केली होती.

रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ते पिकअप घेऊन कांचन पार्क येथील आपल्या घराजवळ आले. तेथील अंतर्गत रस्त्याच्या कडेला किराणा मालासह गाडी पार्क करून लॉक केली आणि घरी गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता त्यांना लोणगाव येथील आठवडे बाजारासाठी जायचे होते. त्यामुळे ते गाडी घेण्यासाठी पार्किंगच्या ठिकाणी आले असता पिकअप गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

त्यांनी परिसरात आणि आजूबाजूला गाडीचा शोध घेतला; मात्र पिकअप मिळून आली नाही. अखेर अज्ञात चोरट्यांनी गाडी चोरून नेल्याची खात्री झाल्यानंतर त्यांनी पोलिसांत धाव घेतली. चोरीस गेलेल्या पिकअपची किंमत सुमारे 7 लाख 50 हजार रुपये असून, त्यामध्ये चापियण कंपनीचे गोडेतेल, तांदूळ, डाळी, साबण आणि इतर किराणा माल असा सुमारे दोन लाख रुपयांचा माल होता. अशा प्रकारे एकूण 9 लाख 50 हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे.
दरम्याण, या प्रकरणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक तारडे करीत आहेत.







