उरुळी कांचन, ता. 12 : उरुळी कांचन परिसरात अवैध दारू विक्री आणि सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करून गोंधळ घालणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कारवाई केली आहे. तळवडे चौकात छापा टाकून देशी-विदेशी दारूचा साठा जप्त करण्यात आला, तर ग्रामपंचायत कार्यालयासमोर मद्यधुंद अवस्थेत आरडाओरडा करून सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या तरुणावरही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या दोन्ही कारवायांमुळे परिसरातील अवैध दारू विक्री आणि मद्यधुंद व्यक्तींच्या उपद्रवाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

उमेश अर्जुन कांचन (वय 45, रा. गोपाळ आळी, उरुळी कांचन) व प्रशांत संदीप जाधव (वय 26, सध्या रा. उरुळी कांचन, मूळ रा. काळेवाडी, दिवे, ता. पुरंदर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उरुळी कांचन येथील तळवडे चौकात हॉटेल शैलजाच्या भिंतीच्या आडोशाला एक व्यक्ती विनापरवाना देशी-विदेशी दारूचा साठा करून विक्री करीत असल्याची गोपनीय माहिती दौंड विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव डस यांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक नामदेव तारडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी 10 नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास छापा टाकला.
यावेळी उमेश कांचन याच्याकडे पांढऱ्या पिशवीत विनापरवाना दारूच्या बाटल्या आढळून आल्या. त्यामध्ये टँगो पंचच्या पाच, एक्स डार्क वर्ल्ड व्हेंटेड रमच्या दोन, टायगर्स बॅरल व्हिस्कीच्या दोन आणि डर्बी स्पेशल डिलक्स व्हिस्कीच्या दोन बाटल्यांचा समावेश होता. पोलिसांनी एकूण 1 हजार 300 रुपयांचा दारूसाठा जप्त केला. याप्रकरणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम 65 (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ग्रामपंचायत कार्यालयासमोर मद्यधुंद तरुणाचा गोंधळ

दुसऱ्या घटनेत उरुळी कांचन ग्रामपंचायत कार्यालयासमोरील सार्वजनिक रस्त्यावर मद्यधुंद अवस्थेत आरडाओरडा करून गोंधळ घालणाऱ्या प्रशांत जाधव याच्यावर पोलिसांनी कारवाई केली. 10 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 4 वाजून 48 मिनिटांनी डायल ११२ वर संबंधित व्यक्ती आत्महत्या करण्याची भाषा करीत असल्याची माहिती प्राप्त झाली होती. त्यानुसार पोलीस शिपाई अनिकेत गायकवाड आणि पोलीस हवालदार शिंदे घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी प्रशांत जाधव मोठमोठ्याने आरडाओरडा करीत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला; मात्र तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता.
दरम्यान, प्रशांत जाधव याच्या तोंडातून दारूचा उग्र वास येत असल्याने त्याला पोलीस ठाण्यात आणून उरुळी कांचन प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले. वैद्यकीय तपासणीत तो दारूच्या अंमलाखाली असल्याचे प्रमाणित झाले. याप्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम 85 (1), 85 (2) आणि भारतीय न्याय संहितेच्या कलम 355 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही प्रकरणांचा पुढील तपास उरुळी कांचन पोलीस करीत आहेत.







