लोणी काळभोर, (पुणे) : गणेशमूर्ती तयार करण्याच्या कामात व्यस्त असलेल्या कुटुंबाच्या कारखाण्यात रात्रीच्या सुमारास सहा जणांनी घुसून एका तरुणीला मारहाण केली. त्यानंतर 2 लाख 40 हजार रुपयांची रोकड जबरदस्तीने घेऊन गेल्याचा धक्कादायक आरोप नातेवाईकांनी केला आहे.

एवढेच नव्हे, तर पैसे देण्यास नकार दिल्यास मुलीला घेऊन जाण्याची धमकी देत तिला हाताला धरून ओढून नेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. शुक्रवारी (ता. 04) रात्री अकरा ते साडेअकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या थरारक आणि भयानक प्रकारामुळे संपूर्ण लोणी काळभोर परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, माळीमळा परिसरात एक कुटुंब गणेशमूर्ती तयार करण्याचे काम करते. गणेशोत्सव तोंडावर आल्याने मूर्तींना रंग देणे तसेच अंतिम कामे करण्यासाठी कुटुंबीय रात्री उशिरापर्यंत कारखान्यातच काम करत होते. त्याचवेळी दुचाकींवरून सहा जण तेथे आले.

गणेशमूर्ती पाहण्याच्या बहाण्याने आलेल्या या व्यक्तींनी कारखान्यातील गणेशमूर्तींची तोडफोड केली. या प्रकारामुळे कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. 2 लाख 40 हजार रुपयांची रोकड जबरदस्तीने घेऊन गेल्याचा धक्कादायक आरोप नातेवाईकांनी केला आहे.
मारहाणीमुळे झालेल्या आरडाओरड आणि गोंधळाचा आवाज ऐकून शेजारी राहणारे दोन नागरिक घटनास्थळी धावून आले. नागरिक येत असल्याचे पाहताच संबंधित सहा जण पळून गेले. यामध्ये एकाच दुचाकीवर चौघेजण गेले तर दोन दुचाकी त्या ठिकाणी सोडून गेले. उर्वरित दोघेही त्या ठिकाणावरून पसार झाल्याची माहिती मिळत आहे. यावेळी सदर ठिकाणी दोन दुचाकी आणि एका व्यक्तीची चप्पल घटनास्थळीच असल्याचे दिसून आले.
या घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलिसांनी तपास सुरू केला असून, घटनास्थळी सोडण्यात आलेल्या दुचाकींच्या आधारे आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, याबाबत मुलीच्या पालकांनी व नातेवाईकांनी पोलिस ठाण्यात केलेले आरोप मागे घेतल्याची माहिती मिळत आहे.







