लोणी काळभोर : पुणे-सोलापूर महामार्गावर भरधाव दुचाकींची धडक होऊन झालेल्या अपघातात 44 वर्षीय दुचाकीस्वाराचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याची घटना लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील बोरकरवस्ती परिसरात शनिवारी (ता. 26) दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

अन्सर बाबूलाल शेख (वय 44, रा. राहिंजवस्ती, लोणी काळभोर) असे अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अन्सर शेख हे सिमेंटचा ट्रक चालविण्याचे काम करीत होते. शनिवारी दुपारी ते स्प्लेंडर दुचाकीवरून सोरतापवाडीच्या दिशेने लोणी काळभोरकडे घरी परतत होते. यावेळी त्यांच्या दुचाकीची त्याच दिशेने जाणाऱ्या अन्य एका दुचाकीशी धडक झाली. या अपघातात शेख गंभीर जखमी झाले.

या घटनेची अपघाताची माहिती मिळताच, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे बिट मार्शल महेंद्र आगळे आणि विक्रम दराडे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने जखमी शेख यांना रुग्णवाहिकेतून लोणी काळभोर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

लोणी काळभोर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. दरम्यान, अपघातातील दुसरी दुचाकी आणि संबंधित चालकाचा शोध घेण्याचे काम लोणी काळभोर पोलिसांकडून सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.







