वृंदावन: प्रेमानंद महाराज यांचे शिष्य म्हणून ओळखले जाणारे दीपक कुमार उर्फ रसिक दुलारी शरण यांच्या मृत्यूचे प्रकरण सध्या चर्चेत आले आहे. 25 सप्टेंबर रोजी त्यांनी चौथ्या मजल्यावरून उडी घेतल्याची प्राथमिक माहिती आहे. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.

या घटनेनंतर त्यांच्या मृत्यूबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. मृतदेहावर काही जखमांच्या खुणा आढळल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच त्यांच्या धोतरावर रक्ताचे डाग असल्याची माहिती समोर आली आहे. या बाबींमुळे प्रकरण अधिक संवेदनशील झाले असून पोलिसांकडून सर्व शक्यता तपासल्या जात आहेत.

एखाद्या व्यक्तीच्या स्वतःच्या गुप्तांगाला अशा प्रकारे गंभीर इजा कशी करू शकतो? त्यानंतर गुप्तांगाच्या कापलेला भागाचा चुरा कसा करू शकतो, असा सवाल कुटुंबीयांनी उपस्थित केला आहे.

रसिक दुलारी यांच्या कुटुंबीयांनी मात्र त्यांच्या मृत्यूबाबत गंभीर शंका व्यक्त केली आहे. आश्रमातील व्यक्तींकडून त्यांना रसिक यांची भेट घेण्यापासून अडवले जात असल्याचा कुटुंबाचा दावा आहे. त्यांच्या शरीरावर झालेल्या काही जखमांबाबतही कुटुंबीयांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. मात्र हे आरोप असून त्याची स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नाही.
पोलिसांच्या माहितीनुसार, प्रेमानंद महाराज यांच्या आश्रमाच्या मागील बाजूस असलेल्या निवासी सोसायटीमधील एका फ्लॅटमध्ये दीपक कुमार गेल्या दीड वर्षापासून राहत होते. ते मूळचे मध्य प्रदेशातील जबलपूर येथील होते. फेब्रुवारी 2025 मध्ये त्यांनी प्रेमानंद महाराज यांच्याकडून दीक्षा घेतली होती.
दीक्षा घेण्यापूर्वी त्यांचे नाव दीपक लोधी असल्याचे सांगितले जाते. त्यानंतर त्यांनी रसिक दुलारी शरण हे नाव स्वीकारले. सुमारे दोन वर्षांपूर्वी ते वृंदावनला आले होते. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, दीक्षेनंतर त्यांचा संपर्क कमी झाला. आईने वृंदावनला भेट दिली असता आश्रमातील अधिकाऱ्यांनी मुलाला भेटू दिले नसल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे.
दरम्यान, पोलिसांकडून आश्रमाशी संबंधित व्यक्तींची चौकशी सुरू आहे. आत्महत्या की या घटनेमागे आणखी काही कारण आहे, या दोन्ही शक्यतांचा तपास केला जात आहे. तपास पूर्ण झाल्यानंतरच रसिक दुलारी शरण यांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.







