मावळ: मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंकवर मंगळवारी पहाटे काही तासांच्या अंतराने दोन अपघात झाले. दोन्ही घटना मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर घडल्या. एका अपघातात केळी घेऊन जाणारा पिकअप टेम्पो उलटला, तर दुसऱ्या घटनेत बस आणि ट्रकची धडक झाली. या अपघातात 6 ते 7 प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

पहिली दुर्घटना रात्री सुमारे 3 वाजता घडली. केळी वाहतूक करणाऱ्या पिकअप टेम्पोवरील चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने टेम्पो रस्त्यावर पलटी झाला. या घटनेत चालक समीर शेख जखमी झाले. त्यांना उपचारासाठी खोपोली नगरपालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

टेम्पो उलटल्यानंतर त्यामधील मोठ्या प्रमाणातील केळी महामार्गावर पडली. त्यामुळे काही काळ या मार्गावर अडथळा निर्माण झाला. अपघातग्रस्त वाहन हटवण्यासोबतच रस्त्यावर विखुरलेला माल बाजूला करण्याचे कामही करण्यात आले.

दरम्यान, पहाटे सुमारे 5 वाजता याच मार्गावर आणखी एक अपघात झाला. लोणावळा हद्दीत बस आणि ट्रकची धडक झाली. या दुर्घटनेत बसमधील 6 ते 7 प्रवासी जखमी झाल्याचे समोर आले आहे.
जखमींपैकी 2 जणांना खोपोली नगरपालिका रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. आणखी एका व्यक्तीवर खोपोली-शीळ फाटा येथील सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. इतर जखमींना पनवेलमधील महात्मा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.
बस आणि ट्रकची धडक नेमकी कोणत्या कारणामुळे झाली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेनंतर संबंधित मार्गावरील वाहतूक काही काळ थांबवण्यात आली. घटनास्थळी मदतकार्य आणि वाहन हटवण्याचे काम सुरू करण्यात आले.
बोरघाट दस्तुरी महामार्ग पोलिसांकडून दोन्ही घटनांचा तपास केला जात आहे. एकाच मार्गावर अल्प कालावधीत दोन अपघात झाल्याने मिसिंग लिंकवरील वाहतूक सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.






