संतोष पवार
पळसदेव : पावसाची अनियमितता आणि बदलत्या वातावरणामुळे सध्या सर्वत्र पावसाळी आजारांनी डोके वर काढले आहे. पळसदेव (ता. इंदापूर) परिसरात डेंग्यू, चिकुनगुणीया मलेरिया यासारख्या साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव वाढल्याचे चित्र दिसुन येत आहे. पळसदेव परिसरात सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे आणि हवामानातील बदलामुळे सध्या संसर्गजन्य आजार मोठ्या प्रमाणात पसरत आहे. पावसाच्या पाण्यामुळे तयार झालेली पाण्याची डबकी व वाढलेले गवत यामुळे आपसूकच डासांचा प्रादुर्भाव वाढण्यास अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे पळसदेव आणि परिसरात थंडी, ताप येणे, अंगदुखी, सांधेदुखी, गुडघेदुखी आणि सर्दी यांसारखी लक्षणे असलेल्या चिकुनगुणिया, मलेरिया डेंग्यू आदि आजारांनी नागरिक त्रस्त झाले आहेत.
या आजारांवर उपचारांकरिता खासगी दवाखान्यात गर्दी झाल्याचे दिसून येत आहे. दरम्यान याबाबत प्राथमिक आरोग्य केंद्र पळसदेव आणि ग्रामपंचायत यांचेकडून विविध उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. याबाबत प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क केला असता प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकारी डॉ प्रीती चामले (रेड्डी) म्हणाल्या की सगळीकडे पावसाचे वातावरण आहे दरवर्षीपेक्षा यावर्षी पावसाचे प्रमाण जास्त असल्याकारणाने डासांची उत्पत्तीचे प्रमाण जास्त आहे.
जुने टायर, फुटके ड्रम, पाण्याच्या टाक्या, डबकी यामध्ये पावसाचे पाणी साठते त्या पाण्यात डास अंडी घालतात त्यातून डासांची उत्पत्ती होते. यात प्रामुख्याने डेंगू, चिकनगुनिया, मलेरिया असे आजार होण्याचे प्रमाण जास्त असते. पळसदेव प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य अधिकारी आशा वर्कर्स आरोग्यसेवक यंत्रणेकडून पळसदेव गावात आणि परिसरात ठिकठिकाणी भेट देऊन जनजागृती केली आहे. अशा प्रकारे पावसाचे पाणी साठणार नाही. याची खबरदारी घेण्याचे व आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन केले आहे.
पहिले दोन दिवस ताप, उलटी, मळमळ,सांधेदुखी अशा प्रकारची लक्षणे आढळल्यास तत्काळ प्राथमिक आरोग्य केंद्रात निदान करून उपचार घ्यावेत असे आवाहनही आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. दरम्यान ग्रामपंचायत यंत्रणेकडूनही आजारांबाबत खबरदारी घेण्यात येत असून धुरफवारणी यंत्राच्या साहाय्याने धुर फवारणी करणे, पाण्याची डबकी बुजवणे, औषधफवारणी आजारांबाबत जनजागृती आदि उपयोजना सुरू केल्याबाबतची माहिती पळसदेव ग्रामपंचायतीचे सरपंच अंकुशराव जाधव यांनी दिली .