हडपसर, (पुणे) : जागतिक सायकल दिनाचे औचित्य साधून फुरसुंगी (ता. हवेली) येथील सायकलिस्ट ग्रुपच्या वतीने फुरसुंगी (पुणे) ते गोवा अशा विशेष आणि धाडसी सायकल राईडचे आयोजन करण्यात आले आहे. पर्यावरण संवर्धन, प्रदूषणमुक्ती, आरोग्यदायी जीवनशैली आणि तरुणांमध्ये सायकलिंग संस्कृतीचा प्रसार करणे या प्रमुख उद्देशाने या मोहिमेचे रणशिंग फुंकण्यात आले आहे. या मोहिमेत सहभागी झालेल्या सायकलपटूंचे फुरसुंगी आणि हडपसर परिसरातून कौतुक होत आहे.

या विशेष सायकल राईडमध्ये फुरसुंगी परिसरातील सायकलपटू सहभागी झाले आहेत. पुणे ते गोवा हे सुमारे 500 किलोमीटरचे खडतर अंतर अवघ्या दोन दिवसांत पूर्ण करण्याचा या सायकलपटूंचा ठाम मानस आहे. कडक ऊन आणि घाटांचे आव्हान पार करत हे सायकलपटू गोव्याच्या दिशेने रवाना झाले आहेत. या साहसी मोहिमेत अमोल वाजे, जीवन पवार, प्रवीण भोसले, गुणवंत गायकवाड, रवींद्र हरपळे, प्रशांत कामठे, रामदास लावंड, संतोष मुसुडगे, किरण कामठे व गोरख कामठे हे सायकलपटू सहभागी झाले आहेत.
फुरसुंगी सायकलिस्ट ग्रुप गेल्या अनेक वर्षांपासून आरोग्य, फिटनेस आणि सामाजिक जनजागृतीसाठी विविध सायकल मोहिमा राबवत आहे. यापूर्वीही ग्रुपच्या सदस्यांनी तिरुपती बालाजी, अयोध्या, पंढरपूर तसेच इतर अनेक धार्मिक व ऐतिहासिक स्थळांपर्यंत सायकल राईड करून उल्लेखनीय प्रवास पूर्ण केले आहेत.
“सायकल चालवल्यामुळे शारीरिक तंदुरुस्ती तर वाढतेच, पण वाढत्या इंधनाची बचत होऊन पर्यावरणाचे रक्षणही होते. आजची तरुणाई जीम आणि महागड्या गाड्यांकडे वळत असताना, आम्ही सायकलच्या माध्यमातून आरोग्याचा सोपा मंत्र देत आहोत,” अशा भावना ग्रुपच्या सदस्यांनी व्यक्त केल्या.
दरम्यान, फुरसुंगी सायकलिस्ट ग्रुपच्या या धाडसी उपक्रमाचे संपूर्ण पुणे जिल्ह्यातून कौतुक होत असून, या राईडमुळे परिसरातील युवकांमध्ये सायकलिंगबाबत एक नवीन प्रेरणा आणि ऊर्जा निर्माण झाली आहे. भविष्यातही अशाच साहसी व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे ग्रुपच्या वतीने सांगण्यात आले.






