उरुळी कांचन, ता.२७ : नर्सरी हब अशी ओळख असलेल्या पूर्व हवेलीला ऐन हंगामात पाऊस नसल्याने कोट्यवधीहून अधिक रुपयांचा फटका बसत आहे. शेतीला जोडधंदा म्हणून पूर्व हवेलीतील सुमारे पाचशेपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी कोट्यवधी रुपयांचे कर्ज काढून नर्सरी उद्योग सुरू केला. त्यामुळे ही शेतकऱ्यांची मुले आणि या व्यवसायावर अवलंबून असणारे कामगार, वाहतूकदार, परप्रांतीय मजूर असे दहा हजारांहून अधिक लोकांवर सध्या पाऊस नसल्याने चिंतेत आहेत. कामगारांना त्यांचे काम जाण्याची भीती निर्माण झाली आहे.
पावसाळा सुरू होऊन तीन महिन्याचा कालावधी लोटला अपवाद वगळता या कालावधीत एक ही दमदार पाऊस पूर्व हवेलीतील लोणी काळभोर, कुंजीरवाडी, कोरेगाव मूळ, उरुळी कांचनसह परिसरात झाला नाही. विशेष म्हणजे संपूर्ण ऑगस्ट महिना कोरडा चालल्याने दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह नर्सरी व्यवसायिक मोठ्या आर्थिक अडचणीत आला आहे.
मुळा-मुठा उजवा व डावा कालवा, मुळा-मुठा नदी यामुळे पूर्व हवेली तालुक्यात बागायती क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. गेल्या महिन्याभरापासून पुन्हा कडक ऊन पडू लागल्याने आहे. या पाण्याचे बाष्पीभवन होत आहे, तर विहिरी व बोअरच्या पाणी पातळीत घट झाली आहे. त्यामुळे नर्सरीतील रोपांबरोबर शेतात लावलेल्या पिकाची अवस्थाही अत्यंत वाईट झाली आहे.
दरम्यान, उरुळी कांचन, सोरतापवाडी, कोरेगाव मूळ, आळंदी म्हातोबाचीसह पूर्व हवेलीतील अनेक गावांत दहा ते बारा वर्षांपूर्वी रोपवाटिकांचा उद्योग सुरू झाला. अल्प काळातच हा उद्योग भरभराटीला आला. वार्षिक उलाढाल हजारो कोटींमध्ये पोचली आहे. येथून महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण देशात रोपे पाठवली जातात. मागील तीन महिन्यांपासून पाऊस नसल्याने कोट्यवधींचा माल सध्या नर्सरीत पडून आहे. माल विकला नाही तर मोठ्या प्रमाणावार नर्सरी व्यावसायिकांचे नुकसान होणार आहे.
पावसाला सुरुवात होताच नर्सरी होतात सज्ज
शहरात समाधानकारक पाऊस झाला नसला तरी ग्राहकांकडून जूनमध्ये चांगला प्रतिसाद मिळतो. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत ही संख्या कमी झाली आहे. पावसाळ्याला प्रारंभ झाल्यानंतर नर्सरी सज्ज होतात. ग्राहकांची पावले आपोआपच नर्सरीकडे वळली जातात. दरम्यान, मागील तीन महिने पाऊस नसल्याने नर्सरी चालकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. जुलैमध्ये चांगला पाऊस झाल्यास ग्राहकांचा प्रतिसाद वाढलेला असतो. नर्सरीत विविध झाडे तयार करून ठेवली जातात. मात्र, पाऊस नसल्याने नर्सरीतील रोपे जागेवर पडून आहेत.
रोपे विकली गेली नाही तर कोरोनासारखी परिस्थिती
याबाबत बोलताना नर्सरी व्यावसायिक दिलीप शितोळे म्हणाले, “पाऊस नसल्यामुळे ग्राहकांनी नर्सरीकडे तोंड फिरवले आहे. नर्सरी व्यावसायिकांनी बँकेकडून मोठ्या प्रमाणात कर्ज काढले आहे. जर नर्सरीतील रोपे विकली गेली नाहीत तर कोरोनात ज्याप्रकारे दिवस आले. तशाप्रकारे दिवस येणार आहेत. त्यामुळे बँकेचे हफ्ते द्यावेच लागणार आहेत.
पाऊस नसल्याने नर्सरी व्यवसाय धोक्यात
याबाबत बोलताना नर्सरी व्यावसायिक योगेश शिंदे म्हणाले, “पाऊस नसल्याने नर्सरी व्यवसाय हा धोक्यात आला आहे. तयार केलेला माल हा जागेवर पडून आहे. या दिवसात मोठ्या प्रमाणात ग्राहकांची गर्दी असते. मात्र, यावर्षी पाऊस नसल्याने ग्राहकांनीहि नर्सरीकडे तोंड फिरवले आहे.”
पाऊस नसल्याने ग्राहकही येईनात
याबाबत बोलताना चक्रधर नर्सरीचे आशिष कांचन म्हणाले, “गेल्यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला होता. त्यावेळी मोठ्या प्रमाणात नर्सरीतील रोपे विकली गेली होती. मात्र, यावर्षी पाऊस नसल्याने ग्राहकांनी नर्सरीकडे तोंड फिरवले आहे.”