पिंपरी : गेल्या काही दिवसांपूर्वी पिंपरी चिंचवड महापालिकेने वादळी वारे आणि अवकाळी पावसामुळे होर्डिंग कोसळून दुर्घटना होऊ नये, यासाठी खबरदारी म्हणून १५ मे ते १५ जून, असे दोन महिने सर्व होर्डिंग्जवर जाहिरात न लावता, ती रिकामी ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र होर्डिंगधारकांचा प्रतिसाद मिळाला नसल्यामुळे महापालिकेने निर्णय फिरवत होर्डिंगवरील जाहिराती उतरवण्याची मुदत घटवली आहे. त्यामुळे महापालिकेच्या प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
वादळी वारे, अवकाळी पावसामुळे होर्डिंग कोसळून दुर्घटना घडण्याची शक्यता असते. त्यात जीवित व वित्तहानी होऊ शकते. त्यामुळे पावसाळ्यापूर्वीच्या १५ एप्रिल ते १५ जून या काळात होर्डिंग रिकामे ठेवण्यात येणार होते.महापालिकेच्या या निर्णयास होर्डिंगचालकांनी सहमती दिली होती. मात्र, त्या मुदतीमध्ये शहरातील बहुतांश होर्डिंग्जवर जाहिरात झळकत आहेत. महापालिकेकडून वारंवार आवाहन करूनही आता प्रतिसाद मिळत नसल्याने महापालिकेने निर्णय फिरवला आहे. आता २५ मे ते ७ जून अशा १४ दिवसांसाठी हा निर्णय मर्यादित करण्यात आला आहे.त्यामुळे नागरिकांच्या जिवापेक्षा अधिकाऱ्यांना होर्डिंग्जधारकांचीच काळजी असल्याचे दिसत आहे.
दरम्यान महापालिकेने पावसाच्या सुरुवातीस दोन महिने होर्डिंगवर जाहिराती न लावण्याचा निर्णय घेतला. मात्र, होर्डिंगचालक, धारक व जाहिरात एजन्सीचालकांचे उत्पन्न बुडू नये, म्हणून तो कालावधी केवळ १४ दिवसांवर आणण्यात आला आहे. होर्डिंगचालकांच्या दवाबामुळे महापालिकेने निर्णय फिरवल्याने आता आश्चर्य व्यक्त केले जात आहे.