शिक्रापूर, (पुणे) : अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी आरोपीला दहा वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दंड न भरल्यास तीन महिने साधी कैदीचे आदेश पुणे सत्र न्यायालयाचे व्ही. आर. कचरे यांच्या कोर्टानी दिले असून याबाबतचा निकाल गुरुवारी (ता. २१) रोजी दिला आहे. नवनाथ दताञय कांबळे (वय- २३, रा. मु. पो बेलसरगाव ता. उदगीर जि. लातुर) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
शिक्रापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत १६ फेब्रुवारी २०२० ला सकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास फिर्यादी हिच्या घरी कोणी नसताना आरोपीने जबरदस्तीने मुलीशी लगट करून बलात्कार केला होता. याप्रकरणी पिडीत मुलीने शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार आरोपी कांबळे याला अटक करून त्यांच्याविरोधात पोस्कोसह इतर कलमांतर्गत गुन्हे दाखल केले होते. शिक्रापुर पोलीस ठाण्याचे तपास अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक किरण भालेकर यांनी तपास करून कांबळे याच्यावर आरोपपत्र दाखल केले.
सरकारी वकील जावेद खान, विजय फरगडे, विलास पठारे यांनी कोर्टात साक्षी तपासल्या. तसेच सरकारी वकिलांचा युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायाधीश व्ही आर कचरे सञ न्यायालय पुणे यांनी आरोपीस गुन्ह्यात दहा वर्षे सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दंड न भरल्यास तीन महिने साधी कैदीचे आदेश देण्यात आले आहेत.
दरम्यान, कोर्ट पैरवी कर्मचारी म्हणून पोलीस हवालदार एस. बी भागवत, सत्र न्यायालयात पैरवी अंमलदार म्हणून सहायक फौजदार विद्याधर निचीत व जिल्हा न्यायालय पैरवी अधिकारी म्हणून सहायक पोलिस निरीक्षक आकाश पवार यांनी काम पाहिले. समन्स व वाॅरन्ट अमंलदार म्हणून पोलीस उपनिरीक्षक रज्जाक शेख व पोलीस हवालदार प्रफुल्ल सुतार यांनी काम पाहिले.