लोणी काळभोर : फक्त माणूस सोडला तर सृष्टीतील प्रत्येक प्राणी निसर्गाशी जुळवून घेतो, निसर्ग नियमानुसार वागतो. मनुष्याचा मेंदु, बुद्धी निसर्गानेच विकसित केली आहे. तरीही माणूस निसर्गाशी जुळवून घेण्याऐवजी निसर्गावर मात करण्याचा प्रयत्न करत आहे. काही काळानंतर माणसाला या गोष्टींचा खुप त्रास होतो, मात्र तरीही माणूस निसर्गाचं मोठेपण मान्य करत नाही. ही खुप मोठी शोकांतिका आहे असे मत प्रसिद्ध व्याख्याते गणेश शिंदे यांनी व्यक्त केले.
वाकवस्ती, लोणी काळभोर (ता. हवेली) येथील यथार्थ योग स्टुडिओच्या वतीने सुर्यनमस्कार स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ गणेश शिंदे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघाचे पुणे जिल्हाध्यक्ष राजेंद्र बापू काळभोर, कदंब प्रतिष्ठानचे संस्थापक नितीन कोलते, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राजेंद्र हजगुडे, विजय घुले, विशेय कंपनीच्या कामगार संघटनेचे अध्यक्ष सचिन काळभोर, क्षितिज संस्थेच्या संस्थापिका उमाताई माने, सिरम कंपनीच्या कामगार संघटनेचे अध्यक्ष अजित भिंताडे, ज्ञानेश्वर महिला बचत गटाच्या अध्यक्षा विद्या काळभोर, कुणाल काळभोर, यथार्थ योग स्टुडिओच्या संस्थापिका शिल्पा नितीन कोलते आदी उपस्थित होते.
यावेळी “जीवन सुंदर आहे” या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन करताना गणेश शिंदे पुढे म्हणाले मानवी जीवन खुपच सुंदर आहे, फक्त आपण आपली जीवनशैली बदलण्याची गरज आहे. कुठल्याच प्राण्याला किंवा पक्षाला डाएट करायची गरज पडत नाही. कारण त्यांचा आहार, विहार निसर्गाला अनुकूल आहे. आपण मात्र बर्गर, पिझ्झा सारख्या जंक फूडच्या नादी लागलो आहे. आणि त्यामुळेच आपल्या आरोग्याचे नुकसान होत आहे.
भारतीय संस्कृतीमध्ये सुदृढ आरोग्यासाठी योग, प्राणायाम अशा अनेक गोष्टी आहेत. आगामी काळात या गोष्टी छोट्या छोट्या गाव, खेड्यातील लोकांपर्यंत पोहचवण्याची गरज आहे. आपण नाविन्यपूर्ण, नवनवीन गोष्टी स्वीकारल्याच पाहिजेत. परंतु अशा अनेक जुन्या गोष्टी आहेत, ज्यांच्याकडे आपण काळाच्या ओघात दुर्लक्ष केले आहे. आणि त्याचे परिणाम आज आपल्याला भोगायला लागले आहेत. काही गोष्टी अशा आहेत कि ज्यांचे सकारात्मक परिणाम त्या परिस्थितीत समाजावर दिसून येतात. नाविन्य शोधण्याच्या नादात, फॅशनच्या नावाखाली अशा अनेक गोष्टी आपण स्विकारल्या आहेत. त्यामुळे आपल्या आरोग्याकडे आपले कमालीचे दुर्लक्ष झाले आहे. एक दिवस असा येईल कि आपल्याकडे कोट्यवधी रुपये असतील परंतू आपल्याकडे आरोग्य शिल्लक नसेल. आपल्याकडे दहा साखर कारखान्यांचे शेअर्स असतील, परंतु डॉक्टर सांगतील की चमचाभर ही साखर तुम्ही खायची नाही. दोन लाखांचा बेड बनवून घेऊ परंतू डॉक्टर सांगतील सपाट जमिनीवरच झोपायचे. म्हणून आरोग्य महत्त्वाचे आहे, ते जपा.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना यथार्थ योग स्टुडीओच्या संस्थापिका शिल्पा कोलते यांनी संस्थेची वाटचाल, योग, प्राणायाम, सूर्यनमस्कार यांचे आरोग्या संदर्भात महत्व आदी बाबींवर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मधुरा कोलते यांनी तर उपस्थितांचे आभार कुणाल काळभोर यांनी मानले.