पुणे : पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील जेजुरी येथे १३ नोव्हेंबर रोजी श्री खंडोबा देवाच्या सोमवती यात्रेच्या अनुषंगाने वाहतूक कोंडी होऊ नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून वाहतुकीत बदल करण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत. वाहतुक कोंडी होऊ नये म्हणून १३ नोव्हेंबर रोजी पहाटे ५ वाजेपासून ते रात्री १० वाजेपर्यंत पुणे ते पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग क्र. ९६५ आणि पुणे ते बारामती या मार्गावरील जड, अवजड व इतर वाहतूक बंद करुन अन्य पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.
या पर्यायी मार्गाचा करा वापर
- सातारा, फलटण, लोणंद, बारामती येथून पुणे येथे जाण्याकरीता जेजुरी-सासवडकडे येणारी जड, अवजड वाहनांची वाहतुक पुर्णपणे बंद करुन त्यावरील वाहने निरा-मोरगाव-सुपा ते केडगाव चौफुला मार्गे सोलापुर महामार्ग क्रमांक ६५ वरुन पुणे यामार्गाने वळविण्यात येत आहे.
- पुण्याकडून बारामतीकडे येणारी वाहतुक बेलसर-कोथळे-नाझरे-सुपे-मोरगाव रोड मार्ग बारामती या मार्गे वळविण्यात येत आहे.
- बारामती व निरा बाजूकडून जेजुरी मार्गे पुणे बाजूकडे जाणारी जड, अवजड वाहनांची वाहतुक पुर्णपणे बंद करुन ती मोरगाव-सुपा-केडगाव चौफुला मार्गे सोलापुर महामार्ग क्रमांक ६५ वरुन पुणे या मार्गे वळविण्यात येत आहे.
- पुणे बाजुकडून जेजुरी मार्गे फलटण-सातारा बाजुकडे जाणारी जड, अवजड वाहनांची वाहतुक पुर्णपणे बंद करुन सासवड- नारायणपुर-कापुरहोळ मार्गे सातारा-फलटण किंवा सासवड-वीर फाटा-परींचे-वीर-वाठार मार्गे लोणंद या मागे वळविण्यात येत आहे.
- वाहतुकीस लावलेले निर्बंध १३ नोव्हेंबर रोजीच्या ‘श्री खंडोबा देवाची सोमवती यात्रे’करीता येणाऱ्या हलक्या वाहनांसाठी शिथील राहतील. नागरिकांनी वाहतूकीत केलेल्या बदलाची नोंद घेवून सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.