शिरूर: महाराष्ट्र शासनाने १० जून २०२६ रोजी कुंभार समाजाच्या विविध हक्कांचे संरक्षण, कल्याणकारी योजनांचा लाभ आणि पारंपरिक व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी घेतलेल्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयाची शिरूर तालुक्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली.शिरूरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांच्या पुढाकारातून स्वातंत्र्यदिनी कुंभार समाज बांधवांना अधिकृत ओळखपत्रांचे सन्मानपूर्वक वितरण करण्यात आले.त्यामुळे शासकीय योजनांचा लाभ मिळविण्यासह प्रशासकीय कामकाजात समाजबांधवांना मोठी सुलभता निर्माण होणार आहे.

१५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनाचे मुख्य ध्वजारोहण झाल्यानंतर शिरूर येथे आयोजित विशेष कार्यक्रमात तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांच्या हस्ते तालुक्यातील पात्र कुंभार समाज बांधवांना ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले.ओळखपत्र हाती मिळताच लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधानाची भावना दिसून आली.

यावेळी तहसीलदार म्हस्के म्हणाले, “१० जूनचा शासन निर्णय हा पारंपरिक मातीकाम करणाऱ्या कुंभार समाजाच्या सक्षमीकरणासाठी महत्त्वाचा टप्पा आहे.शासनाच्या सर्व कल्याणकारी योजनांचा लाभ तळागाळातील प्रत्येक पात्र कारागिरापर्यंत पारदर्शकपणे पोहोचविणे हे प्रशासनाचे कर्तव्य आहे.या ओळखपत्रामुळे प्रशासकीय कामकाज,योजनांचा लाभ आणि व्यवसायाशी संबंधित परवानग्यांसाठी मोठी सुलभता होईल.”

शासन निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी तहसीलदार म्हस्के यांनी विशेष प्रशासकीय मोहीम राबविली. तहसील कार्यालयातील लिपिक भानुदास येडे यांनी पात्र लाभार्थ्यांची यादी,माहिती संकलन आणि ओळखपत्रांची छपाई यासाठी विशेष परिश्रम घेतले.
दरम्यान,कुंभार समाजाच्या हक्कांसाठी सातत्याने पाठपुरावा करणारे भगवान रामचंद्र श्रीमंदीलकरयांच्या पाठपुराव्यालाही या उपक्रमामुळे यश आले.तहसीलदार म्हस्के व लिपिक येडे यांच्या कार्यक्षमतेबद्दल त्यांनी समाजाच्या वतीने आभार मानले.
यावेळी भूमी अभिलेख विभागाचे उपअधीक्षक अमोल भोसले, भगवान श्रीमंदीलकर,नगरसेविका सविता राजापूरे,नगरसेविका स्वप्नाली जामदार,मच्छिन्द्र जामदार,शिरूर ग्रामीणचे माजी सरपंच रामदास जामदार, शशिकांत शिर्के,विजय शिर्के, दत्तात्रय काळे यांच्यासह कुंभार समाजातील ज्येष्ठ नागरिक, कार्यकर्ते व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशासनाच्या या सकारात्मक भूमिकेमुळे तालुक्यातील कुंभार समाजात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.







