पुणे : पुणे जिल्ह्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी आता शेवटच्या टप्प्यात आली आहे. एकूण 21 संचालक पदांच्या जागांसाठी विविध राजकीय पक्ष आणि अपक्ष मिळून तब्बल 514 उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची उद्या, 30 सप्टेंबर ही शेवटची तारीख असल्याने सर्वच पक्षांतील इच्छुकांच्या राजकीय हालचाली कमालीच्या वाढल्या आहेत.

सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी सुमारे 275 इच्छुकांनी दावा केला आहे. बारामती येथील पक्षाच्या कार्यालयात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि युवा नेते जय पवार यांनी इच्छुका मुलाखती घेतल्या. यावेळी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आपली भूमिका मांडली असली, तरी अंतिम उमेदवारी कोणाच्या पदरात पडणार याबद्दल अद्याप उत्सुकता कायम आहे. या उमेदवार निवडीची मुख्य सूत्रे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार पार्थ पवार आणि जय पवार यांच्याकडे आहेत. जुन्या संचालकांनाच पुन्हा संधी मिळणार की नवीन चेहऱ्यांना वाव दिला जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची धुरा युवा नेते युगेंद्र पवार सांभाळत आहेत. त्यांनी कारखान्याच्या पश्चिम भागातील गावांचा दौरा करून सभासदांशी थेट संवाद साधण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या पक्षाकडूनही मोठ्या संख्येने अर्ज आले असून, निवडणुकीत या गटाची भूमिका निर्णायक ठरणार आहे.

दरम्यान, सत्ताधारी कृती समितीचे नेते सतीश काकडे यांनी सत्ताधारी राष्ट्रवादीला पाठिंबा दिल्याने निवडणुकीतील राजकीय समीकरणांना नवीन वळण मिळाले आहे. भाजप, शिवसेना, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि रासप हे पक्ष स्वतंत्र लढणार की कोणाला पाठिंबा देणार, हे 30 सप्टेंबरनंतरच स्पष्ट होणार आहे.
दरम्यान दोन्ही राष्ट्रवादी गटांमध्ये युती होणार की नाही, याबद्दलही सभासदांमध्ये चर्चा सुरू आहे. अर्ज माघारीच्या मुदतीनंतरच निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार असून, संपूर्ण बारामतीसह पुणे जिल्ह्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे.







