अमरावती : एका खाटीकाने विजयवाडा येथे पैशाच्या जुन्या वादातून एका महिलेची अमानुष हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी शफी आणि त्याला मदत करणाऱ्या गुरुवुलू नावाच्या एका सहकाऱ्याला ताब्यात घेतले आहे.

इब्राहिमपुरा भागात एका अज्ञात महिलेचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळला होता. सुरुवातीला पोलिसांना तिची ओळख पटवणे कठीण जात होते. मात्र, पोलिसांनी प्रसिद्ध केलेल्या मृतदेहाच्या फोटोंमुळे या प्रकरणाचा उलगडा झाला. सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल झाल्यानंतर तिच्या हातावरील टॅटूवरून नातेवाइकांनी तिची ओळख ‘कल्याणी’ अशी पटवली. यानंतर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली.

तपासादरम्यान पोलिसांना भवानीपुरम परिसरात मटणाचे दुकान चालवणाऱ्या शफी याच्यावर संशय आला. कल्याणी आणि शफी यांच्यात पैशांवरून मोठा वाद सुरू होता. 17 सप्टेंबर रोजी शफीने कल्याणीला आपल्या घरी बोलावून घेतले. तिथे दोघांमध्ये पुन्हा जोरदार भांडण झाले. या वादातून शफीने तिच्यावर सुऱ्याने वार करून तिची हत्या केली.

गुन्ह्याची विल्हेवाट लावण्यासाठी आणि आपली ओळख लपवण्यासाठी शफीने मटणाच्या दुकानात काम करणाऱ्या गुरुवुलूच्या मदतीने कल्याणीच्या मृतदेहाचे 9 तुकडे केले. हे सर्व तुकडे त्यांनी गोल्लापुडी परिसरातील एका कालव्यात फेकून दिले.
इब्राहिमपुरा पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुब्रमण्यम यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रसारमाध्यमे आणि सोशल मीडियाच्या सहकार्यामुळेच या गुन्ह्याचा उलगडा करणे शक्य झाले. सध्या पोलीस आरोपींची अधिक चौकशी करत असून त्यांनी मृतदेहाची वाहतूक कशी केली आणि या संपूर्ण प्रकरणात दोघांची नेमकी काय भूमिका होती, याचा सखोल शोध घेत आहेत.






