पुणे : अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पत्रकार परिषदेत विभागाच्या कामकाजासह लहान मुलांच्या खाद्यपदार्थांबाबत महत्त्वाची माहिती दिली. अन्न व औषध प्रशासन विभागाने आतापर्यंत 22 रेग्युलेशन आणि 11 ऑर्डर काढल्या असून, त्याचा परिणाम आता दिसून येत असल्याचे मुंढे यांनी सांगितले.

शाळांमधील खाद्यपदार्थांबाबत यापूर्वी 22 महिने ते 18 वर्षे वयोगटातील मुलांसाठी आदेश काढण्यात आला होता. मात्र, दोन वर्षांखालील बालकांच्या खाद्यपदार्थांबाबतही नियमांची गरज असल्याने नव्याने आदेश काढण्यात आल्याचे मुंढे यांनी सांगितले. हा आदेश नवजात बालकांपासून दोन वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी लागू राहणार आहे.

दोन वर्षांखालील मुलांना पॅकेजिंगमधून दिल्या जाणाऱ्या विविध उत्पादनांमध्ये शिशु फॉर्म्युला, शिशु दूधअन्न आणि इतर खाद्यपदार्थांचा समावेश होतो. सहा महिन्यांनंतर दोन वर्षांपर्यंत पॅकबंद पारंपरिक शिशु अन्न दिले जाते. मात्र, सहा महिन्यांपर्यंत बालकाला आईचे दूध देणे आवश्यक असल्याचे तुकाराम मुंढे यांनी सांगितले. नव्या आदेशाची अंमलबजावणी पुरवठादार, ब्रँड मालक आणि ई-कॉमर्स विक्रेत्यांनाही करावी लागणार आहे.

गेल्या काही महिन्यांत राज्यभरात या उत्पादनांची तपासणी करण्यात आल्याचे मुंढे यांनी सांगितले. अनेक ठिकाणी शिशु खाद्यपदार्थांच्या पॅकेटच्या पुढील बाजूस ‘आईचे दूध सर्वोत्तम दूध’ अशा स्वरूपाची आवश्यक सूचना आढळून आली नाही. तसेच, बालकाला संबंधित अन्न कोणत्या वयापासून द्यावे, याबाबतची माहिती आणि आवश्यक इशारा सूचनाही काही उत्पादनांवर नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पॅकेजिंगवर बालकाला संबंधित अन्न कधीपासून द्यावे, याची स्पष्ट माहिती देणे आवश्यक करण्यात आले आहे. भारतात यासंदर्भात दोन कायदे लागू असल्याचेही मुंढे यांनी सांगितले.






