डॉ. अशोक बालगुडे

मुंबई : चित्रपटसृष्टीत वय वाढते, प्रसिद्धी उंचावते, पदे बदलतात; पण जुन्या मैत्रीचा हिशेब काही बदलत नाही! याचा प्रत्यय आला ‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी माधुरी दीक्षितसोबतच्या 42 वर्षांपूर्वीच्या आठवणी सांगितल्या आणि जुन्या नात्यातील गोडवा मिश्किलपणे उलगडला.
1984 मध्ये ‘अबोध’ चित्रपटातून माधुरीने हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्या वेळी ती अवघी 16 वर्षांची होती. बारावीच्या परीक्षेची तयारी सुरू असल्याने चित्रपटाचे चित्रीकरणही मे महिन्यापर्यंत पुढे ढकलण्यात आले होते. या चित्रपटात अशोक सराफ यांनी तिच्यासोबत काम केले होते.

कार्यक्रमात अशोक सराफ यांनी माधुरीला ‘मॅडम’ म्हणून संबोधले. त्यावर माधुरीने लगेचच, ‘मला मॅडम का म्हणताय? माधुरी म्हणा. आपलं एवढं जवळचं नातं आहे,’ अशी आठवण करून दिली. त्यावर अशोकमामांनीही आपल्या खास विनोदी अंदाजात, ‘तुम्ही त्या खुर्चीवर बसलेल्या आहात म्हणून मॅडम म्हणतोय; बाहेर भेटलात तर काय गं, बरी आहेस ना, असेच विचारेन,’ असे सांगितले. त्यांच्या या उत्तराने मंचावर हास्याची लकेर उमटली.

‘अबोध’नंतर दोघांची भेट थेट 1997 मध्ये ‘कोयला’च्या चित्रीकरणावेळी झाली. चार दशकांत माधुरी स्टार झाली, ‘धकधक गर्ल’ म्हणून जगभर पोहोचली; पण अशोकमामांच्या आठवणींत ती आजही तीच निरागस माधुरी आहे. पडद्यावरचे स्टारडम कितीही मोठे असले, तरी जुन्या माणसांसमोरचा आपलेपणा काही ‘मॅडम’ होत नाही, हेच अशोकमामांनी आपल्या मिश्किल उत्तरातून दाखवून दिले!






