पुणे : खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या एका मोठ्या चोरीचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. कुरिअर कंपनीतील एका 20 वर्षीय तरुणाने विश्वासघात करत तब्बल 28 लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. या प्रकरणी पोलिसांनी उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये तब्बल 25 दिवस शोधमोहीम राबवत आणि सुमारे 10,000 किलोमीटरचा प्रवास करत मुख्य आरोपीसह चौघांना पोलिसांनी अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना 30 ऑक्टोबर 2026 रोजी घडली होती. विशाल सत्यपाल चौहान हा तरुण पुण्यातील एका कुरिअर कंपनीत कामाला होता. त्याच्याकडे कंपनीकडून रोख रक्कम आणि सोने-चांदीचे दागिने असलेली एक बॅग मुंबईतील कार्यालयात पोहोचवण्यासाठी देण्यात आली होती. या बॅगेत एकूण 28 लाख रुपयांचा मुद्देमाल होता. मात्र, मुंबईला जाण्याऐवजी विशालने ती बॅग घेऊन पळ काढला.
घटनेची माहिती मिळताच खडक पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांचे पथक आरोपींच्या मागावर उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड राज्यात रवाना झाले. एटा, कासगंज, गौतम बुद्ध नगर आणि देहरादून या शहरांमध्ये सलग 25 दिवस पोलिसांनी कसून शोध घेतला. या प्रदीर्घ पाठलागानंतर अखेर आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले.

या गुन्ह्यात मुख्य आरोपी विशालला त्याच्या नातेवाईकांनी आणि मित्रांनी मदत केल्याचे तपासात समोर आले आहे. पोलिसांनी विशालसह त्याचा भाऊ बिनेश सत्यपालसिंग चौहान, मेहुणा ब्रिजेश सुरेंद्रसिंह चौहान, राधेश्याम ऊर्फ पिकू चौहान आणि मित्र विकास कुमार जाधोन यांना ताब्यात घेतले आहे. अटक केलेल्या या टोळीकडून पोलिसांनी आतापर्यंत 26.33 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम हस्तगत केली आहे.

या कारवाईमुळे पुण्यातील व्यापारी आणि कुरिअर व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला असून पुढील तपास पोलीस करत आहेत






