उरुळी कांचन, (पुणे) : पुणे जिल्ह्यातील हजारो दिव्यांग बांधवांसाठी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण समितीच्या बैठकीत जिल्ह्यातील तब्बल 9 हजार 840 दिव्यांग लाभार्थ्यांना एप्रिल ते ऑक्टोबर अखेर अशा सलग सात महिन्यांचा प्रति महिना 500 रुपये प्रमाणे एकूण 5 कोटी 90 लाख रुपयांचा निर्वाह भत्ता वितरीत करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. अशी माहिती जिल्हा परिषदेचे समाजकल्याण समितीचीचे सभापती जितेंद्र बडेकर यांनी दिली. या निर्णयामुळे ऐन दिवाळीच्या तोंडावर दिव्यांग बांधवांची दिवाळी यंदा खऱ्या अर्थाने गोड होणार आहे.

पुणे जिल्हा परिषद येथे शुक्रवारी (ता. 30) समाजकल्याण समितीची विशेष व महत्त्वपूर्ण बैठक समितीचे सभापती जितेंद्र बडेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीला समाजकल्याण समितीचे सर्व सन्माननीय सदस्य व संबंधित अधिकारी उपस्थित होते. बैठकीमध्ये जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांच्या कल्याणासाठी चालवल्या जाणाऱ्या विविध शासकीय योजना, त्यांच्या अडचणी आणि जीवनमान उंचावण्यासाठी आवश्यक असणाऱ्या उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
जिल्हा परिषद पुणे अंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांना आर्थिक मदत म्हणून दरमहा निर्वाह भत्ता अदा करण्यात येतो. गेल्या काही महिन्यांपासून थकित असलेला हा भत्ता दिवाळी सणापूर्वीच लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग व्हावा, यासाठी सभापती जितेंद्र बडेकर यांनी विशेष पुढाकार घेतला.

या निर्णयानुसार जिल्ह्यातील 9 हजार 840 पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना एप्रिल 2026 ते ऑक्टोबर 2026 अखेरच्या सात महिन्यांचा प्रति महिना रु. 500 एकूण 5 कोटी 90 लाख रुपयांचा निधी वितरित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील दिव्यांग बांधव व त्यांच्या कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. जिल्हा परिषदेच्या या तत्पर व संवेदनशील निर्णयाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.
“जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांना सर्व शासकीय योजनांचा लाभ वेळेत मिळावा आणि त्यांना आर्थिक पाठबळ मिळावे, हाच आमचा मुख्य उद्देश आहे. यंदाची दिवाळी दिव्यांग बांधवांसाठी आनंदाची जावी, यासाठी 7 महिन्यांचा थकीत निर्वाह भत्ता त्वरित वितरित करण्याचा सकारात्मक निर्णय घेतला आहे,”
जितेंद्र बडेकर, सभापती, समाजकल्याण, जिल्हा परिषद पुणे







