डॉ. अशोक बालगुडे

पुणे : महादेवनगर (मांजरी बु।।, ता. हवेली) येथील एका दुकानाला पेट्रोल टाकून आग लावल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. या आगीत दुकानातील साहित्य, मालमत्ता आणि इतर वस्तू जळून खाक झाल्याने सुमारे चार ते पाच लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. दुकानाला जाणीवपूर्वक लक्ष्य करून आग लावण्यात आल्याच्या संशयामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, अज्ञात व्यक्तीने दुकानाजवळ पेट्रोल टाकून आग लावली. पेट्रोलमुळे आगीने काही क्षणांतच रौद्र रूप धारण केले. दुकानातील साहित्याने पेट घेतल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आगीची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, आगीची तीव्रता लक्षात घेता दुकानातील साहित्य वाचविणे शक्य झाले नाही.

या घटनेमुळे संबंधित व्यावसायिकाचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, अचानक ओढवलेल्या संकटामुळे त्यांच्यासमोर व्यवसाय पुन्हा उभा करण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, दुकानाला अपघाताने आग लागली की नियोजनपूर्वक पेट्रोल टाकून ती लावण्यात आली, याचा तपास होणे आवश्यक आहे.
महादेवनगर परिसरात दुकानाला पेट्रोल टाकून आग लावण्याचा प्रकार घडल्याने नागरिक आणि व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. परिसरातील दुकाने व व्यावसायिक आस्थापनांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही या निमित्ताने ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी घटनेची सखोल चौकशी करून आग लावणाऱ्यांचा शोध घ्यावा आणि संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.






