पुणे : भोर तालुक्यातील एका गावात १२ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी ५५ वर्षीय आरोपीला पुणे येथील विशेष जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने दोषी ठरवले आहे. भारतीय दंड विधानातील कलम ३५४, ३५४ अ आणि पोक्सो कायद्यातील कलम ८ व १२ अंतर्गत आरोपीला दोषी ठरवण्यात आले. आरोपी १२ डिसेंबर २०२२ पासून कारागृहात असल्याने त्याने आतापर्यंत भोगलेल्या कारावासाइतकीच शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे.

दिलीप तुकाराम चौधरी (वय ५५, रा. वडगाव डाळ, ता. भोर) असे दोषी ठरवण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मंगळवारी (ता. २४ नोव्हेंबर २०२६) शिवाजीनगर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात विशेष जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एस. गांधी यांच्या न्यायालयात या प्रकरणाचा निकाल जाहीर करण्यात आला.
पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, १२ डिसेंबर २०२२ रोजी दुपारी सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास पीडित मुलगी शाळेच्या मागील रस्त्यावर उभी होती. त्यावेळी आरोपी तेथे आला. त्याने मुलीला बोलण्यात गुंतवून तिचा हात धरला आणि तिच्याशी गैरवर्तन केले. त्यानंतर मुलीने आरोपीच्या तावडीतून स्वतःची सुटका करून घरी धाव घेतली आणि घडलेला प्रकार कुटुंबीयांना सांगितला.

या घटनेनंतर मुलीच्या कुटुंबीयांनी भोर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार आरोपीविरोधात भारतीय दंड विधानातील कलम ३५४, ३५४ अ आणि पोक्सो कायद्यातील कलम ८ व १२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणाचा तपास भोर पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक बी. एस. सांगळे यांनी केला. न्यायालयात विशेष सरकारी अभियोक्ता लीना पाठक यांनी सरकार पक्षाची बाजू मांडली.
न्यायालयाने आरोपीला संबंधित कलमांनुसार दोषी ठरवून १२ डिसेंबर २०२२ पासून आजपर्यंत त्याने कारागृहात भोगलेल्या कालावधीइतकीच कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम ४२८ नुसार कारागृहात घालवलेल्या कालावधीची सवलत देण्याचे आदेश दिले. इतर कोणत्याही गुन्ह्यात आरोपीची आवश्यकता नसल्यास त्याला तातडीने मुक्त करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत. न्यायनिर्णयाची प्रत आरोपीला विनामूल्य देण्याचे आदेश देण्यात आले असून, या निकालाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात अपील करता येईल, अशी समजही आरोपीला देण्यात आली.
ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि भोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. न्यायालयीन कामकाजासाठी भोर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी तसेच पुणे ग्रामीणचे न्यायालयीन पैरवी अधिकारी यांनी सहकार्य केले.






