राहुलकुमार अवचट

यवत: कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी यवत पोलीस स्टेशनला भेट देऊन पोलीस स्टेशनची वार्षिक तपासणी केली. सदर वार्षिक तपासणी दरम्यान यवत पोलीस स्टेशनच्या दप्तर, अभिलेख, गुन्हे दाखल व तपास कामकाज, कायदा व सुव्यवस्था तसेच गुन्हे प्रतिबंधक उपाययोजना यांचा सखोल आढावा घेतला यानंतर यवत पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार, पोलीस स्टेशन हद्दीतील पोलीस पाटील व महिला यांची विशेष बैठक आयोजित करून बैठकीत विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी उपस्थितांना सायबर गुन्हे, फसवणुकीचे गुन्हे, महिलांविषयक गुन्हे तसेच अमली पदार्थाचे दुष्परिणाम याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी पोलीस पाटीलांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. गावपातळीवरील कायदा व सुव्यवस्था, माहिती संकलन तसेच गुन्हे प्रतिबंध यामध्ये पोलीस पाटलांची भूमिका महत्वाची असल्याचे सांगून त्यांच्या समस्या सोडविण्याबाबत आश्वासन दिले. पोलीस पाटीलांना गावातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी, गुन्हे प्रतिबंधासाठी तसेच सामाजिक शांतता व सुरक्षितता कायम ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनास सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

सदर वार्षिक तपासणीदरम्यान यवत पोलीस स्टेशनच्या एकूण कामकाजाचा व कामगिरीचा आढावा घेतल्यानंतर विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी यवत पोलीस स्टेशनच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले. सदर वार्षिक तपासणीवेळी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी बापुराव दडस यांसह अनेक अधिकारी उपस्थित होते. नागरिकांची सुरक्षितता, गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण आणि जनतेमध्ये कायद्याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी यवत पोलीस स्टेशन कटिबद्ध आहे असे यावेळी पोलिस निरीक्षक संतोष तासगावकर यांनी सांगितले.
मोबाईल व सोन्याच्या दागिने असा ७ लाख ५० हजारांचा मुद्देमाल तक्रारदारांना परत
यवत पोलीस स्टेशन हद्दीतील विविध गुन्ह्यांमध्ये चोरी गेलेले २१ मोबाईल फोन व ३ तोळे सोनेचे दागिने असा एकूण ७,५०,०००/- रुपयांचा मुद्देमाल विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांच्या हस्ते तक्रारदारांना परत सुपूर्द करण्यात आलेला असून तक्रारदारांनी पोलीस प्रशासनाचे आभार मानले.






