पुणे : शेतकऱ्यांच्या पडीक जमिनीबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे.सर्वसामान्य शेतकऱ्यांची शेती कुळ कायद्याखाली शासनाच्या ताब्यात जाणार नाही. स्वतःच्या शेतात राबणाऱ्या मूळ शेतकऱ्यांच्या जमिनींना कोणताही धोका नाही असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे.

बावनकुळे यांनी असे म्हटले आहे कि, ज्या मोठ्या गुंतवणूकदारांनी किंवा व्यक्तींनी 50, 100 किंवा 200 एकर जमीन विकत घेऊन लँड बँक उभी केली आहे आणि ती तशीच पडीक ठेवली आहे, त्यांच्यासाठी हे आवाहन आहे. अनेक ठिकाणी फक्त फार्महाऊस बांधून शेतीकडे दुर्लक्ष केले जाते. इतक्या मोठ्या प्रमाणावर जमीन पडीक राहणे राज्य आणि देशाच्या विकासासाठी योग्य नाही. त्यामुळे अशा जमीनधारकांनी पुढील 3 ते 5 वर्षांत आपल्या शेतीवर पिके घ्यावीत, असे त्यांनी सुचवले.
1948 च्या कुळ कायद्यातील कलम 65 बद्दल आपण बोललो होतो, पण त्याचा चुकीचा अर्थ काढला गेला किंवा गैरसमज पसरवला गेला, असे बावनकुळे म्हणाले. या कलमाचा संदर्भ तीन वर्षे पडीक राहिलेल्या जमिनीच्या प्रशासनाशी असला, तरी त्याचा फटका सर्वसामान्य शेतकऱ्यांना बसणार नाही. कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील स्वतः शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची एक गुंठाही जमीन सरकार काढून घेणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

शेतकऱ्यांचे हक्क टिकवणे आणि त्यांच्या जमिनी सुरक्षित ठेवणे हेच महसूल खात्याचे काम आहे. जमिनी बळकावण्यासाठी हे खाते नाही. पडीक जमिनींवर चारा, बांबू किंवा इतर कोणतीही पिके घेतल्यास कृषी उत्पादन वाढेल आणि अर्थव्यवस्थेला हातभार लागेल. चांगल्या पावसाचा फायदा घेऊन किमान पुढील 3 वर्षांत लागवड सुरू करावी, अशी विनंती बावनकुळे यांनी केली.
या वादावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्याशी फोनवर बोलणे झाल्याचेही बावनकुळे यांनी सांगितले. आपली बाजू ऐकून त्यांना ती मान्य झाल्याचे त्यांनी नमूद केले. त्यामुळे सामान्य शेतकऱ्यांनी कोणतीही भीती किंवा संभ्रम मनात ठेवू नये, असे त्यांनी पुन्हा एकदा ठामपणे सांगितले.






