बारामती : बारामती-भिगवण मार्गावरील सावळ गावच्या हद्दीत असलेल्या शिवन्या लॉजमध्ये सुरू असलेल्या कथित देहव्यवसायाचा बारामती तालुका पोलिसांनी छापा टाकून पर्दाफाश केला. महिलेला पैशांचे आमिष दाखवून देहव्यवसाय करण्यास प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून लॉजमालकासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी (ता. 23) सायंकाळी ही कारवाई करण्यात आली.

या प्रकरणी लॉज व्यवस्थापक आदित्य पांडुरंग पवार (वय 22), साफसफाई कर्मचारी महंमद नजीर शेख (वय 54) आणि लॉजमालक निलेश मच्छिंद्र शिंदे (रा. वंजारवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवन्या लॉजमध्ये महिलेला पैशांचे आमिष दाखवून देहव्यवसायास प्रवृत्त केले जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी प्रथम बोगस ग्राहक पाठवून माहितीची खातरजमा केली. त्यानंतर पोलिस पथकाने लॉजवर छापा टाकत संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई केली.

या प्रकरणी सहायक पोलीस उपनिरीक्षक राजीव शिंदे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम 143(3), 3(5) तसेच अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम 1956 मधील कलम 4 व 5अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक नारायण पवार पुढील तपास करीत आहेत.






