पुणे : ‘मी घर सोडून जात आहे,’ असा संदेश आईच्या मोबाइलवर पाठवून १६ वर्षीय मुलगा मध्यरात्री घरातून निघून गेला. मुलगा घरात नसल्याचे लक्षात येताच आईने नातेवाइकांकडे आणि परिसरात शोधाशोध सुरू केली. मात्र, तो सापडत नसल्याने त्यांनी खराडी पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून मुलाचा शोध सुरू केला. अखेर मित्रांनी समजावून सांगितल्यानंतर मुलाने घरी परतण्याचा निर्णय घेतला. अवघ्या आठ तासांत तो सुखरूप घरी परतल्याने कुटुंबीयांनी सुटकेचा निश्वास सोडला.

खराडी परिसरात राहणारा हा मुलगा डेहराडून येथे इयत्ता अकरावीत शिक्षण घेत आहे. १२ ऑक्टोबर रोजी वाढदिवसानिमित्त तो पुण्यात घरी आला होता. त्यानंतर दिवाळीच्या सुट्टीमुळे त्याचा मुक्काम वाढला. सुट्टी संपल्यानंतर २० नोव्हेंबर रोजी आईने त्याला पुन्हा शाळेत जाण्यास सांगितले. मात्र, डेहराडूनला जाण्याची इच्छा नसल्याने त्याने नाराजी व्यक्त केली होती.
दरम्यान, रविवारी रात्री आई आणि मुलाने एकत्र जेवण केले. त्यानंतर मध्यरात्री दोनच्या सुमारास आईला मुलगा घरात नसल्याचे लक्षात आले. त्याचा मोबाइलही बंद होता. त्यातच आईच्या मोबाइलवर ‘मी घर सोडून जात आहे’ असा संदेश आल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली.

आईने नातेवाइकांकडे चौकशी केली. मुलगा डेहराडूनला पोहोचला आहे का, याचीही माहिती घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा काहीच ठावठिकाणा लागत नसल्याने त्यांनी खराडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मुलाला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याचा संशय आईने व्यक्त केला. त्यानुसार पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून शोध सुरू केला.
पोलिसांकडून मुलाचा शोध सुरू असतानाच त्याच्या मित्रांनी त्याला समजावून सांगितले. मित्रांच्या योग्य सल्ल्यानंतर मुलाने घरी परतण्याचा निर्णय घेतला. घरातून निघाल्यानंतर सुमारे आठ तासांत तो सुखरूप घरी परतला. मुलगा सुरक्षित परतल्याने आई आणि नातेवाइकांचा जीव भांड्यात पडला.
प्राथमिक माहितीनुसार, दिवाळीची सुट्टी संपल्यानंतर पुन्हा डेहराडूनला शाळेत जावे लागणार असल्याच्या नाराजीतून त्याने घर सोडल्याचे समोर आले आहे.






