लोणी काळभोर : जमिनीचे वाढते भाव, झपाट्याने होणारे नागरीकरण आणि सहज पैसे कमावण्याच्या मोहात शिक्षणाचे महत्त्व काहीसे दुर्लक्षित होत असताना, एका अल्पभूधारक शेतकऱ्याच्या मुलाने आपल्या जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर यशाचे शिखर गाठले आहे. लोणी काळभोर येथील गौरव दादासो वलठे याने रशियातील स्मॉलेन्स्क स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीमधून सहा वर्षांचे वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले असून, भारतातील परवाना परीक्षा असलेल्या एफएमजीई मध्येही यश मिळवले आहे. त्याच्या या यशामुळे पूर्व हवेलीच्या शैक्षणिक क्षेत्रात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

गौरवचा हा प्रवास संघर्षाचा आणि प्रेरणेचा आहे. त्याचे प्राथमिक शिक्षण सिद्राम मळा येथील जिल्हा परिषद शाळेत, माध्यमिक शिक्षण हडपसरमधील साधना विद्यालयात, तर उच्च माध्यमिक शिक्षण पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात झाले. घरची परिस्थिती बेताची आणि वडिलांकडे अल्प शेती असतानाही त्याने डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगले. त्यासाठी त्याने थेट रशियाची वाट धरली.
परदेशातील शिक्षणाचा प्रवास मात्र सोपा नव्हता. रशियातील कडाक्याची थंडी, भाषेची अडचण, वेगळी जीवनशैली आणि कुटुंबापासून हजारो किलोमीटर दूर राहण्याचे आव्हान त्याच्यासमोर होते. विशेष म्हणजे, गौरव लहानपणापासून माळकरी आणि शुद्ध शाकाहारी असल्याने तेथील आहाराशी जुळवून घेणेही कठीण होते. मात्र, त्याने हार न मानता घरून आवश्यक साहित्य नेऊन स्वतः स्वयंपाक करण्याचा मार्ग निवडला. शिक्षणासोबत स्वयंपाकाची जबाबदारीही सांभाळत त्याने सहा वर्षांचा अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण केला.

रशियातून वैद्यकीय पदवी मिळवल्यानंतर भारतात वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी एफएमजीई ही महत्त्वाची परवाना परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक होते. या परीक्षेच्या तयारीसाठी गौरवने दिल्ली येथे तीन महिने कठोर परिश्रम घेतले. 31 ऑक्टोबर 2026 रोजी झालेल्या परीक्षेचा निकाल 10 नोव्हेंबरला जाहीर झाला. देशभरातील 42 हजार 113 परीक्षार्थींपैकी केवळ 9 हजार 354 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. अवघ्या 22.87 टक्के निकाल लागलेल्या या परीक्षेत गौरवने यश मिळवून आपल्या स्वप्नाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकले.
आता एक वर्षाची इंटर्नशिप पूर्ण करून वैद्यकीय क्षेत्रात पदव्युत्तर शिक्षण घेण्याचा त्याचा मानस आहे. अल्पभूधारक शेतकऱ्याच्या घरातून सुरू झालेला गौरवचा हा प्रवास पूर्व हवेलीतील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे. जमिनीच्या भावापेक्षा शिक्षणाची आणि ज्ञानाची झेप कितीतरी मोठी असते, हे गौरवने आपल्या कर्तृत्वातून दाखवून दिले आहे. त्याच्या यशाबद्दल त्याचे आणि वलठे कुटुंबीयांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.






