पुणे : हिंजवडी आयटी पार्कमधील एका नामांकित कंपनीत काम करणाऱ्या सॉफ्टवेअर अभियंता तरुणीचा तिच्याच ओळखीतील तरुणाने खून केल्याची घटना समोर आली आहे. इन्फोसिसमध्ये कार्यरत असलेल्या शुभम ज्ञानेश्वर काळबांडे याने प्रेयसी कोमल राजेंद्र डहाके (वय २७) हिचा खून केल्याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी त्याला अटक केली आहे. सोमवारी मध्यरात्रीनंतर ही घटना घडली. खून केल्यानंतर आरोपी रात्रभर तरुणीच्या मृतदेहाजवळ बसून होता, अशी माहिती समोर आली आहे. प्रेमसंबंधातील वादातून हा प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुभम आणि कोमल हे गेल्या तीन वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते. शुभम इन्फोसिसमध्ये, तर कोमल विप्रोमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करत होती. ओळखीचे रूपांतर प्रेमसंबंधात झाले होते. दोघांनी लग्न करण्याचाही विचार केला होता.
मात्र, काही काळानंतर त्यांच्या नात्यात संशय आणि वाद निर्माण होऊ लागले. शुभमचे इतर मुलींशी प्रेमसंबंध असल्याचा कोमलला संशय होता. यावरून दोघांमध्ये वारंवार वाद होत असल्याची माहिती तपासात समोर आली आहे.

घटनेच्या दिवशीही दोघांमध्ये याच कारणावरून वाद झाल्याचे सांगितले जात आहे. या वादानंतर शुभमने कोमलला आधी भिंतीवर आणि त्यानंतर बेडवर आपटून मारहाण केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या मारहाणीत तिचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपी रात्रभर मृतदेहाजवळ बसून राहिल्याचेही समोर आले आहे.
कोमल ज्या गर्ल्स हॉस्टेलमध्ये राहत होती, तेथे पुरुषांना प्रवेश कसा मिळाला आणि हॉस्टेलमध्ये पुरेशी सुरक्षा व्यवस्था होती का, असे प्रश्न तिच्या कुटुंबीयांनी उपस्थित केले आहेत. या घटनेला जबाबदार असलेल्या आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी कोमलच्या आतेभावाने केली आहे.
या प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी शुभम काळबांडे याला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. प्रेमसंबंधातील वादातून घडलेल्या या घटनेमुळे आयटी क्षेत्रातही चिंता व्यक्त केली जात आहे.






