पुणे : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या कायदेशीर अडचणींमध्ये आता मोठी भर पडण्याची चिन्हे दिसत आहेत. अजय महाराज बारस्कर यांनी जालन्यातील अंबड पोलीस ठाण्यात हजर राहून जरांगे यांच्याविरोधात तक्रार देत गुन्हा दाखल करण्याची आग्रही मागणी केली आहे. या तक्रारीसोबतच त्यांनी पोलिसांकडे काही महत्त्वाचे पुरावे असलेला एक पेन ड्राइव्हदेखील सुपूर्द केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मनोज जरांगे यांनी नुकतीच येत्या 7 डिसेंबरपासून संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करण्याची घोषणा केली होती. त्यांच्या या घोषणेला 24 तास पूर्ण होण्याआधीच बारस्कर यांनी आक्रमक पवित्रा घेत पोलीस ठाणे गाठले आहे. यापूर्वी बारस्कर यांनी मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार अर्ज दिला होता. या तक्रारीची दखल घेत जालना पोलिसांनी त्यांना सर्व पुराव्यांसह प्रत्यक्ष हजर राहण्याची सूचना केली होती. त्यानुसार आज ते पुराव्यांचा पेन ड्राइव्ह घेऊन अंबड पोलीस ठाण्यात दाखल झाले.
आपल्या तक्रारीत बारस्कर यांनी जरांगे यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. उपोषणादरम्यान जरांगे यांनी जालन्याच्या महिला जिल्हाधिकारी अशिमा मित्तल यांच्याबद्दल आक्षेपार्ह आणि लज्जा उत्पन्न करणारे वक्तव्य केल्याचा दावा त्यांनी केला आहे. यासोबतच मुख्यमंत्री फडणवीस यांच्याविरोधातही त्यांनी खालच्या पातळीची भाषा वापरल्याचे बारस्कर यांचे म्हणणे आहे. एवढेच नाही तर, जरांगे हे मराठा समाजातील तरुणांना आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्यास प्रवृत्त करत असल्याचा खळबळजनक आरोपही त्यांनी या वेळी केला.

जरांगे यांच्या वक्तव्याचे गांभीर्य लक्षात घेता त्यांच्यावर तात्काळ एफआयआर (FIR) नोंदवणे कसे आवश्यक आहे, हे बारस्कर यांनी पोलिसांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. आता पोलीस या पुराव्यांची पडताळणी करून नेमकी काय कारवाई करतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.






