दौंड, ता. 23 : दौंड तालुक्यातील खामगाव येथे बिबट्यासदृश वन्यप्राण्याने तबेल्यात घुसून तब्बल 17 बोकडांचा फडशा पाडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका रात्रीत मोठ्या संख्येने पशुधन ठार झाल्याने शेतकरी तेजस रमेश म्हेत्रे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, खामगावसह सहजपूर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

शेतकरी तेजस म्हेत्रे यांनी ईदच्या पार्श्वभूमीवर बाजारातून हे बोकड खरेदी केले होते. त्यांचे चांगल्या पद्धतीने पालन-पोषण केले जात असताना रात्रीच्या सुमारास बिबट्याने तबेल्यावर हल्ला केला. एका पाठोपाठ एक अशा तब्बल 17 बोकडांवर हल्ला करून त्यांना ठार करण्यात आले.

सकाळी ही घटना निदर्शनास आल्यानंतर ग्रामस्थांनी तातडीने वनविभागाला माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच वनरक्षक ज्ञानदेव भोंडवे, गणेश म्हस्के तसेच यवतच्या वनपाल भाग्यश्री टोणपे यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. मृत पशुधनाचा नियमानुसार पंचनामा करण्यात आला. यावेळी शेतकरी शुभम सणस, संकेत म्हेत्रे, अभिजीत लोखंडे, सुनील विधाटे, समीर शेख यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

या घटनेमुळे म्हेत्रे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. याबाबत वनपरीक्षेत्र अधिकारी राहुल काळे यांनी शासनाच्या नियमानुसार आवश्यक कार्यवाही करून एक महिन्याच्या आत नुकसानभरपाई देण्यात येईल, अशी माहिती दिली. खामगाव परिसरात बिबट्याचा वावर असल्याच्या घटनांमुळे वाड्या-वस्त्यांवरील नागरिक, शेतकरी आणि पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने नागरिकांना रात्रीच्या वेळी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान, पशुधन सुरक्षित आणि बंदिस्त ठिकाणी बांधावे, रात्रीच्या वेळी एकट्याने बाहेर पडणे टाळावे तसेच वन्यप्राण्यांना चिथावणी देऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. मानव-बिबट संघर्ष टाळण्यासाठी वनविभागाकडून गावात जनजागृतीही करण्यात येत आहे. एकाच रात्री 17 बोकड ठार झाल्याने पशुपालकांमध्ये खळबळ उडाली असून, परिसरात वनविभागाने बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवून तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.







