शिरूर: सोशल मीडियाच्या वाढत्या वापरासोबत सायबर गुन्हेगारीचे प्रकारही वाढत असून, सोशल मीडिया वापरकर्त्यांनी विशेषतः अल्पवयीन व किशोरवयीन तरुण-तरुणींनी अधिक सावध राहण्याची गरज निर्माण झाली आहे. शिरूर शहर परिसरातील एका १९ वर्षाच्या विद्यार्थिनीचा सोशल मीडियावरून सायबर छळ करून तिला धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील शिरूर शहर परिसरातील एक विद्यार्थिनी (ता.१) गुरुवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास घरी असताना, “vishalkhatpe26” या Snapchat अकाउंटवरून तिच्या अकाउंटवर अश्लील स्वरूपाचा फोटो पाठविण्यात आला.

यानंतर संबंधित अनोळखी व्यक्तीने तरुणीला तुझे फोटो आपल्याकडे असल्याचे सांगून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच स्नॅपचॅटवरील समोरच्या व्यक्तीने आणखी खासगी स्वरूपाचे फोटो व व्हिडिओ पाठविण्यासाठी तरुणीवर दबाव टाकला. त्यानंतर संबंधित व्यक्तीने तरुणीला भेटण्यासाठी येण्याची मागणी करत, भेटण्यास न आल्यास पाठविलेले व्हिडिओ वेबसाईटवर अपलोड करण्याची धमकी दिली.

या प्रकारामुळे सोशल मीडिया वापरताना अनोळखी व्यक्तींशी मैत्री करणे, खासगी फोटो-व्हिडिओ शेअर करणे आणि वैयक्तिक माहिती देणे किती धोकादायक ठरू शकते, याची पुन्हा एकदा जाणीव झाली आहे. सोशल मीडियावर काही भामटे किंवा सायबर गुन्हेगार बनावट अकाउंटच्या माध्यमातून तरुण-तरुणींशी संपर्क साधून त्यांचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करतात.हेच पुन्हा सिद्ध झाले आहे.
या प्रकरणी “vishalkhatpe26” हे Snapchat अकाउंट चालविणाऱ्या अनोळखी इसमाविरुद्ध तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार अनिल आगलावे हे करीत आहेत.
तरुण-तरुणींनी काय काळजी घ्यावी?
अनोळखी व्यक्तींकडून आलेल्या फ्रेंड रिक्वेस्ट किंवा मेसेजला प्रतिसाद देताना सावधगिरी बाळगावी. कोणत्याही व्यक्तीला खासगी फोटो, व्हिडिओ, पासवर्ड, OTP किंवा वैयक्तिक माहिती देऊ नये. कोणी फोटो-व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत असल्यास घाबरून त्याच्या मागण्या पूर्ण करण्याऐवजी तातडीने पालक, विश्वासू व्यक्ती किंवा पोलिसांशी संपर्क साधावा.
सोशल मीडिया हे माहिती आणि संवादाचे प्रभावी माध्यम आहे; मात्र, त्याचा अतिरेक किंवा निष्काळजी वापर सायबर गुन्हेगारांसाठी संधी ठरू शकतो. त्यामुळे सोशल मीडियाचा वापर आवश्यकतेपुरताच आणि सुरक्षित पद्धतीने करणे, हाच अशा प्रकारांना प्रतिबंध करण्याचा महत्त्वाचा मार्ग आहे.






