पुणे: केतन अग्रवाल प्रकरणाच्या तपासात पुणे पोलिसांनी दाखल केलेल्या 5,000 हून अधिक पानांच्या चार्जशीटमधून अनेक बाबी समोर येत आहेत. तपासादरम्यान चेतन चौधरीच्या मोबाईलमधील WhatsApp आणि Instagram चॅट डिलीट केल्यानंतर तो डेटा पुन्हा मिळवता येईल का, याबाबतही त्याने चौकशी केल्याचे पोलिसांच्या नोंदीत नमूद असल्याची माहिती आहे.

या प्रकरणात चेतन आणि सिया यांच्यातील संबंधांबाबतही पोलिसांनी काही माहिती गोळा केली आहे. नोव्हेंबर 2025 मध्ये NIBM रोडवरील एका हॉटेलमध्ये दोघांनी बुकिंग केल्याचे तपासात समोर आले. त्यानंतर जानेवारी 2026 मध्ये गुलटेकडी परिसरातील एका हॉटेलमध्येही दोघांनी मुक्काम केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या संदर्भात हॉटेल व्यवस्थापकाचा जबाबही नोंदवण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

दरम्यान, चेतनचे इतर तरुणींशीही संबंध असल्याचा दावा तपासात समोर आला आहे. पोलिसांनी दोन कॉलेज तरुणींचे जबाब नोंदवले आहेत. त्यापैकी एक तरुणी लातूरची असून ती दुसऱ्या मैत्रिणीसोबत पुण्यात राहत असल्याची माहिती आहे.

9 मे 2026 रोजी या दोघी पुण्यातील एस.बी. रोडवरील एका क्लबमध्ये गेल्या होत्या. त्यांच्यासोबत एका तरुणीचा प्रियकर आणि चेतन चौधरीही होता. पार्टीदरम्यान चौघांनी मद्यपान केल्यानंतर रात्री उशिरा ते मार्केट यार्ड परिसरातील लॉजमध्ये गेल्याचे तपासात नमूद आहे.
संबंधित तरुणी आणि तिचा प्रियकर एका खोलीत, तर दुसरी तरुणी चेतनसोबत दुसऱ्या खोलीत गेल्याचे पोलिसांच्या नोंदीत असल्याची माहिती आहे. संबंधित तरुणीने चेतनने तिच्यासोबत संबंध ठेवण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप केल्याचे सांगितले जाते. दुसऱ्या तरुणीनेही चेतनने यापूर्वी दोन-तीन वेळा अशाच प्रकारे संबंध ठेवण्याचा प्रयत्न केल्याचे पोलिसांना सांगितल्याची माहिती आहे. या सर्व जबाब आणि पुराव्यांच्या आधारे पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे.






