पुणे: लोहगाव परिसरात बनावट कागदपत्रे आणि परवानग्या खऱ्या असल्याचे भासवून इमारत उभारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या इमारतीतील फ्लॅटची विक्री करून जमीनमालकासह शासन, ग्राहक आणि वित्तीय संस्थांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून बांधकाम व्यावसायिक आणि आर्किटेक्टविरोधात लोहगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी निलेश मारुती शिंदे (वय 43, रा. वनश्री, अॅमेनोरा रोड, हडपसर) यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यानुसार बांधकाम व्यावसायिक श्रीनिवास जोन्ना लगड्डा (वय 49, रा. प्रणयराज हेरिटेज, टिंगरेनगर) आणि आर्किटेक्ट रोहीत लोंढे यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, लोहगावमधील साठे वस्ती येथे निलेश शिंदे यांच्या मालकीची 3153 चौरस फूट जागा आहे. या जागेच्या विकासासाठी श्रीनिवास लगड्डा यांनी शिंदे यांच्यासोबत विकास करार केला आणि त्यानंतर कुलमुखत्यारपत्र घेतल्याचे तक्रारीत नमूद आहे.

यानंतर पुणे महानगरपालिकेच्या बांधकाम परवानग्या आणि इतर कागदपत्रे तयार करण्यात आली. ही कागदपत्रे अधिकृत असल्याचे भासवण्यासाठी शासकीय शिक्के आणि मोहरांचाही कथित वापर करण्यात आल्याचा आरोप आहे. त्याआधारे संबंधित जागेवर बांधकाम करण्यात आले.
बांधकाम पूर्ण झाल्यानंतर इमारतीमधील फ्लॅट ग्राहकांना विकण्यात आल्याचा आरोप आहे. या व्यवहारांमध्ये आर्किटेक्ट रोहीत लोंढे यांनी मदत केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
विशेष म्हणजे, कथित बनावट कागदपत्रे फ्लॅटच्या खरेदी-विक्री करारांसोबत जोडून ती दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदवण्यात आल्याचा आरोप आहे. त्यामुळे शासनासह फ्लॅट खरेदीदार आणि संबंधित वित्तीय संस्थांचीही फसवणूक झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
हा प्रकार 6 ऑगस्ट 2020 पासून आतापर्यंत घडल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक एस. एम. खांडेकर करत आहेत.






