पुणे : ‘सैराट’ या चित्रपटामुळे अभिनेता आकाश ठोसर आणि अभिनेत्री रिंकू राजगुरू ही जोडी महाराष्ट्रातील घराघरात पोहोचली. या सिनेमाला 10 वर्षे उलटली असली तरी आर्ची आणि परश्याची जोडी आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. चित्रपटातील त्यांच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांनी मोठी पसंती दिली होती.

‘सैराट’नंतर दोन्ही कलाकारांनी स्वतंत्रपणे आपापल्या अभिनय कारकिर्दीवर लक्ष केंद्रित केले. रिंकूने मराठीसोबत हिंदी आणि दक्षिण भारतीय चित्रपटांमध्येही काम केले. दुसरीकडे आकाशने निवडक चित्रपटांमधून प्रेक्षकांसमोर आपली वेगळी ओळख निर्माण केली.

दरम्यान, आकाश आणि रिंकू अनेकदा एकत्र दिसल्याने त्यांच्या नात्याबाबत सोशल मीडियावर चर्चा रंगत असे. दोघे एकमेकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना किंवा सोशल मीडियावर फोटो शेअर करताना दिसायचे. त्यामुळे चाहत्यांकडून त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमसंबंधात झाल्याच्या चर्चा केल्या जात होत्या.
मात्र, या चर्चांवर दोघांनीही कधी अधिकृत दुजोरा दिला नाही. एका मुलाखतीत आकाश ठोसरने याबाबत स्पष्ट भूमिका मांडली होती. मुलाखतीत त्याने सांगितले होते की, त्याच्यात आणि रिंकूमध्ये केवळ चांगली मैत्री आहे. मित्र एकत्र भेटतात, फिरतात आणि मजा करतात, त्यापलीकडे काही नसल्याचे त्याने स्पष्ट केले होते.







