मुबंई : प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता दिनो मोरिया याला मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने राहत्या घरातून ताब्यात घेतले आहे. मिठी नदीच्या स्वच्छता आणि गाळ उपसा कामात झालेल्या कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मिठी नदीच्या गाळ उपशाशी संबंधित हा घोटाळा 2005 पासून सुरू असल्याचा संशय असून, या प्रकल्पात एकूण 1300 कोटी रुपयांहून अधिकचा अपहार झाल्याचे आरोप आहेत. विशेषतः 2019 ते 2021 या काळात सुमारे 65 कोटी रुपयांचा मोठा गैरव्यवहार झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेसोबतच सक्तवसुली संचालनालय देखील समांतर चौकशी करत आहे. यापूर्वी अंमलबजावणी संचालनालयाने दिनो मोरिया याच्या घरावर छापा टाकून काही महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली होती.

मिठी नदीच्या स्वच्छतेसाठी मुंबई महानगरपालिकेने ड्रेजिंग मशीन आणि गाळ उपसा करणारी साधने खरेदी केली होती. ही खरेदी कोची येथील ‘मॅटप्रॉप टेक्निकल सर्व्हिसेस’ या कंपनीकडून करण्यात आली होती. तपासादरम्यान आरोपींनी बनावट कागदपत्रे सादर करून पालिकेची फसवणूक केल्याचे उघडकीस आले. या प्रकरणात आतापर्यंत विविध कंत्राटदार, मध्यस्थ, कंपनी संचालक आणि पालिकेच्या आजी-माजी अधिकाऱ्यांसह 13 जणांवर आझाद मैदान पोलीस ठाण्यात FIR दाखल करण्यात आला आहे.
चौकशी दरम्यान अभिनेता दिनो मोरिया आणि त्याचा भाऊ सँटिनो मोरिया यांचे नाव समोर आले. या गैरव्यवहारातील मुख्य संशयित आरोपी केतन कदम याच्याशी या दोघांनी अनेकदा टेलिफोनवरून संपर्क साधल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. यापूर्वी पोलीस उपायुक्त संग्रामसिंह निशाणदार यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथकाने प्राथमिक तपास करून तक्रार नोंदवली होती.
दरम्यान, दिनो मोरिया हा शिवसेना (ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरे यांचा निकटवर्तीय मानला जातो. याशिवाय दिशा सालियान प्रकरणातही त्याचे नाव चर्चेत आले होते. सध्या पोलीस त्याची अधिक सखोल चौकशी करत असून, या कारवाईमुळे चित्रपट आणि राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.







