सागर जगदाळे

भिगवण: दुष्काळी परिस्थितीत शेतातील उभी पिके वाचवण्यासाठी धडपडणाऱ्या शेतकऱ्यांच्या पाईपलाईन व मोटारींची तोडफोड तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून दडपशाही आणि शिवीगाळ केल्याचा गंभीर प्रकार इंदापूर तालुक्यातील शेटफळगढे येथे समोर आला आहे. खडकवासला धरणातून इंदापूरसाठी कालव्यातून सोडलेले पाणी टेलपर्यंत (शेवटच्या टोकापर्यंत) पोहोचवण्यासाठी पाणी उपसा करणाऱ्या मोटारी बंद करण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र, हे काम करताना कंत्राटी कर्मचाऱ्यांनी पाईप फोडल्याने आणि अरेरावी केल्याने परिसरात संतापाची लाट पसरली आहे.

नेमका वाद काय?
इरिगेशन (पाटबंधारे) विभागाच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, कॅनलचे पाणी अद्याप इंदापूरच्या शेवटच्या टोकापर्यंत पोहोचण्यास सुमारे पाच किलोमीटरचे अंतर बाकी आहे. टेल भागातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची व शेतीची गरज पूर्ण करण्यासाठी पाठीमागील भागातील पाणी उपसा थांबवणे गरजेचे होते. यासाठी गावातून ध्वनिक्षेपकाद्वारे मोटारी बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र, तरीही उपसा सुरू राहिल्याने नाईलाजास्तव पाईप फोडण्याची कारवाई करावी लागल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.
दुसरीकडे, आधीच दुष्काळाने होरपळणारा शेतकरी पिके वाचवण्यासाठी धडपडत असताना पाईपलाईन व साहित्याची तोडफोड केल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. कर्मचाऱ्यांकडून दमदाटी व शिवीगाळ करण्यात आल्याचा आरोपही शेतकऱ्यांनी केला आहे.

पाटकरी महेश साळुंके यांची प्रतिक्रिया
याबाबत शेटफळगढे येथील पाटकरी महेश साळुंके यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी परिस्थिती स्पष्ट केली. त्यांनी सांगितले की, “संबंधित कंत्राटी कर्मचारी गेल्या तीन-चार वर्षांपासून या ठिकाणी कंत्राटी पद्धतीने कार्यरत आहेत. शेतकऱ्यांना मोटारी बंद करण्याबाबत आधीच योग्य ती कल्पना व सूचना देण्यात आली होती. मात्र, सूचना दिल्यानंतरही काही शेतकऱ्यांनी मोटारी सुरू ठेवल्यामुळे नाईलाजास्तव ही कारवाई करण्यात आली.”
अनाधिकृत उपशावर कारवाई व्हावी, पण तोडफोड आणि दमदाटी का?
कालव्यासाठी स्वतःच्या जमिनी दिलेल्या शेतकऱ्यांनाच पाण्यासाठी दडपशाही सहन करावी लागत असल्याने स्थानिक पातळीवर तीव्र सवाल उपस्थित केले जात आहेत. नियमबाह्य पाणी उपसा होत असल्यास अधिकृत प्रक्रियेनुसार कारवाई होणे आवश्यक आहे, परंतु कंत्राटी कामगारांना थेट पाईप फोडण्याचा किंवा शेतकऱ्यांना शिवीगाळ करण्याचा अधिकार कोणी दिला? असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत.
प्रशासनाची भूमिका व कारवाईचा इशारा
शाखा अधिकारी राजश्री पाडवी: त्यांनी या संदर्भात बोलताना मांडलेली माहिती पायाहीन असल्याचे सांगत, तक्रार असलेल्या शेतकऱ्यांनी कार्यालयात यावे, त्यांच्याशी चर्चा करून तक्रारींचे निवारण केले जाईल, असे स्पष्ट केले.
कार्यकारी अभियंता किरण देशमुख: “दुष्काळी परिस्थितीत कालव्याच्या शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचवणे गरजेचे आहे. पाटबंधारे विभागाकडे कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने निविदा प्रक्रियेद्वारे कंत्राटी कामगार नेमले आहेत. शेतकऱ्यांना अरेरावी वा दमदाटी करणाऱ्या कामगारांवर कडक कारवाई केली जाईल, तसेच त्यांना कामावरून तातडीने हटवले जाईल. अनधिकृत मोटारी स्वतःहून काढून घेण्याचे आवाहन आम्ही करत आहोत, शेतकऱ्यांचे कोणतेही नुकसान केले जाणार नाही,” अशी ग्वाही त्यांनी दिली.
पारदर्शक नियोजनाची गरज
कॅनलचे पाणी शेवटच्या टोकापर्यंत पोहोचवणे आणि पिण्याच्या पाण्याची सोय करणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच शेतकऱ्यांची उभी पिके वाचवणेही गरजेचे आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाने पाणी वितरणाचे स्पष्ट वेळापत्रक जाहीर करून अधिकृत पंचनाम्याद्वारे नियमानुसार पारदर्शक कारवाई करावी, अशी मागणी शेटफळगढे परिसरातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे.






