लोणी काळभोर, (पुणे) : पुणे जिल्हा तालुका पंचायत समिती सभापती असोसिएशनच्या ‘अध्यक्षपदी’ आंबेगावचे कैलास बुवा काळे यांची ‘उपाध्यक्षपदी’ हवेलीचे सभापती युवराज हिरामण काकडे सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. तर ‘सचिवपदी’ बारामतीचे सभापती किरण तावरे यांची निवड करण्यात आली आहे.

पुणे जिल्ह्यातील सर्व 13 तालुक्यांतील पंचायत समित्यांचे अधिकार, रखडलेला विकासनिधी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांसमोर असलेल्या अडचणींवर प्रभावीपणे तोडगा काढण्यासाठी जिल्हा परिषदेच्या सभागृहात पार पडलेल्या सर्व 13 तालुक्यांच्या सभापतींच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

या निवडीनंतर संघटनेच्या वतीने, सर्व तालुका पंचायत समिती सभापतींच्या विविध मागण्यांचे निवेदन, पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांच्या दालनात देण्यात आले. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांचीही भेट घेऊन विविध मागण्या मांडण्यात आल्या.
यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष कैलास काळे, उपाध्यक्ष युवराज काकडे व सचिव किरण तावरे यांनी ‘पुणे जिल्ह्यातील सर्व तालुका पंचायत समितींना’ भेडसावणाऱ्या विविध अडचणी, समस्या, विकासकामांसाठी आवश्यक निधी, अधिकार व स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित प्रश्न सोडविण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून जिल्हा तसेच राज्य पातळीवर प्रभावीपणे पाठपुरावा करून, लवकरच राज्याचे मुख्यमंत्री व दोनही उपमुख्यमंत्री महोदयांची भेट घेणार असल्याचे नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, या बैठकीस नवनिर्वाचित अध्यक्ष कैलास काळे, उपाध्यक्ष युवराज काकडे, सचिव किरण तावरे (दूरदृश्य प्रणालीद्वारे), शिरूर सभापती स्वातीताई घावटे, मावळ सभापती सुनीताताई येवले, भोर सभापती मनीषाताई कंक, मुळशी सभापती मंदाताई शेळके, राजगड सभापती सुवर्णाताई राऊत, खेड सभापती विद्याताई मोहिते, इंदापूर सभापती हर्षवर्धन लोंढे, पुरंदर सभापती अमित झेंडे आदी उपस्थित होते.







