करमाळा : कुंभारगाव परिसरात जिओच्या नेटवर्कचा खेळखंडोबा सुरू असून व्हॉइस कॉललाही आवाज येत नाही,तर इंटरनेटही चालत नाही. त्यामुळे जिओच्या ग्राहकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
जिओचे नेटवर्क गावागावात पोहोचल्यानंतर, कुंभारगाव, घरतवाडी परिसरात असलेले बीएसएनएल,आयडिया, वोडाफोनचे, एअरटेलचे ग्राहक हे जिओमध्ये पोर्ट होऊन जवळपास 90% ग्रामस्थांकडे जिओचे सिम कार्ड व जिओ नेटवर्क आले.मात्र मागील दोन – तीन महिन्यापासून परिसरातील गावांमध्ये जिओला अत्यंत कमी नेटवर्क येत आहे. तसेच फोनला आवाज येत नाही.मोबाईल वरती इंटरनेट चालत नाही. त्यामुळे शेकडो रुपयांचे रिचार्ज हे वाया जात असून, ग्राहकांना आर्थिक भुरदंडाला सामोरे जावे लागत आहे. जिओच्या या असलेल्या तक्रारीबाबत संबंधित कर्मचारी यांच्याशी संपर्क साधला असता, उडवा -उडवी ची उत्तरे देऊन तोंडाला पाने पुसण्याचे काम केले जाते. वरिष्ठ अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता आमच्या हातामध्ये काही नसून १९९ ला कॉल करा. असे बेजबाबदारपणे सांगितली जात आहे त्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे
दरम्यान 5G चा जमाना असताना 4G लाच व्यवस्थित नेटवर्क नसल्या कारणाने परिसरातील नागरिकांचा जिओच्या टॉवरबद्दल नाराजीचा सूर व संतप्त प्रतिक्रिया पाहायला मिळत आहे.आवाज येत-जात नसल्याने जिओ ग्राहकांमध्ये चिडचिड होत आहे.तर इंटरनेटच्या साह्याने होणारी ऑनलाइन कामे ही देखील करणे कठीण झाले आहे. त्यामुळे जिओ प्रशासनाने तात्काळ जिओ नेटवर्क पातळी वाढवावी व या बाबींकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी कुंभारगाव, घरतवाडी व परिसरातील ग्रामस्थांकडून होत आहे.