शिरूर : शिरूर तालुक्यात आमदार पुत्र ऋषिराज पवार यांचे अपहरण-खंडणी प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. आमदार पुत्रच जर सुरक्षित नाही तर सर्वसामान्य नागरीकांचे काय? असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. या प्रकरणामुळे वातावरण चांगलेच ढवळून निघाले असून या प्रकरणला राजकिय रंग देण्याचा प्रयत्न सुरु होता, परंतु हे प्रकरण राजकीय अथवा जातीय नसून मुख्य आरोपीस कर्ज झाल्याने त्याने मारहाण व खंडणीचा गुन्हा केला असल्याचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी सांगितले आहे.
आमदार अशोक पवार यांचे चिरंजीव, रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन ऋषीराज पवार यांच्या फिर्यादीनुसार भाऊसाहेब विरा कोळपे (वय ३० रा. कोळपे वस्ती, मांडवगण फराटा) यांच्यासह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी कोळपे यांच्यासह मयुर संजय काळे (वय २४ रा. शिवाजी चौक, मांडवगण फराटा) व तुषार संजय कुंभार (वय २१ रा., मांडवगण फराटा) या तिघांना अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणात कोळपे याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. १५ लाख रुपयांचे कर्ज झाल्याने हा गुन्हा केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. ज्या ठिकाणी गुन्हा घडला तो बंगला आरोपीच्या बहिणीचा असून गुन्ह्याचा व्हिडिओ पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आला आहे. गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेल्या वस्तू देखील पोलिसांनी ताब्यात घेतल्या असल्याचे केंजळे यांच्याकडून सांगण्यात आले आहे.
नेमकं प्रकरण काय?
ऋषिराज पवार यांचे महिलेसोबत अश्लील फोटो काढून त्यांना दहा कोटींची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार ९ नोव्हेंबर रोजी घडला होता. या गंभीर प्रकरणाला राजकीय रंग चढला होता. विरोधकांचे आमच्या कुटुंबाला बदनाम करण्याचे षडयंत्र असल्याचा आरोप आमदार अशोक पवार यांच्याकडून करण्यात आला होता. तर महायुतीच्या वतीने या घटनेची सखोल चौकशीची मागणी तसेच याकुडे राजकीय चष्म्यातून पाहू नये, अशी भूमिका घेण्यात अली होती.