योगेश शेंडगे
रांजणगाव : रांजणगाव एमआयडीसीमध्ये टाटा स्टील कंपनीत लोखंडी कॉईल उतरवण्यासाठी आलेल्या ट्रेलर चालकांकडून दमदाटी करून माथाडीची बोगस पावती देऊन फसवणूक केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी दोन अनोळखी तरुणांवर रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत जितेंद्र श्रीराम कुशवाह (वय 34 वर्ष रा.पंखडकोला थाना तरकुआ जी.देवरिया राज्य. उत्तर प्रदेश) या ट्रक ड्रायव्हरने फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक २५ ऑगस्ट रोजी ९ वाजता फिर्यादी हे त्यांच्या ताब्यातील ट्रेलर नंबर (MH 14AQ 3199) हा रांजणगाव एमआयडीसीमधील टाटा स्टील कंपनीत कॉइल खाली करण्यासाठी मेन गेट जवळ येऊन थांबले होते.
दोन अनोळखी तरुण यांनी फिर्यादीस ‘माथाडीची पावती फाडायला लागेल, टाटा स्टील कंपनीचे गेटमध्ये तुझी गाडी जाऊ देणार नाही, जर तू आठशे रुपयाची पावती फाडली नाही तर तुझ्या गाडीच्या काचा, टायर आम्ही फोडू’ अशी धमकी देऊन फिर्यादी कडून ६००रुपये तसेच इतर दोन ट्रेलर यांच्याकडून प्रत्येकी आठशे रुपये असे एकूण २२०० रुपये घेऊन माथाडीची बोगस पावती देऊन फसवणूक केली आहे.
तसेच २८ ऑगस्ट रोजी पुन्हा फिर्यादीला आठशे रुपयाची पावती फाडण्यासाठी धमकी देऊन रात्री बारा वाजता त्यांच्या ट्रेलरची हवा सोडून नुकसान केले. सदर घटनेचा पुढील तपास रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशनचे सहाय्यक फौजदार दत्तात्रय शिंदे करीत आहे.