इंदापूर, (पुणे) : इंदापूरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार आणि शरद पवार गटामध्ये तुफान राडा झाला आहे. विविध विकासकामांचे उद्घाटन आज होणार होते. दरम्यान, भुमिपूजनाच्या कोनशिलेवर खासदार सुप्रिया सुळे याचं नाव नसल्याने शरद पवार गट चांगलाच आक्रमक झाला आहे. विशेष म्हणजे आमदार दत्तात्रय भरणे यांच्या समोरच राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापटी झाल्याची माहिती आहे. दोन्ही गट आमने-सामने आल्याने मोठा वाद पाहायला मिळाला आहे. यामुळे काही वेळ इंदापूर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.
नेमकं काय घडल?
इंदापुरात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाच्या उद्घाटनाच्या कोनशिलेवरती खा. सुप्रिया सुळे यांचं नाव टाकल नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच शरद पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. तात्काळ कोनशिलेवरती खासदार सुप्रिया सुळे याचं नाव टाका असा आग्रह करूनही शेवटी उद्घाटन झाले. यावेळी उद्घाटनाला आमदार दत्तात्रय भरणे स्वतः उपस्थित असताना दोन्ही गट अचानक समोरासमोर आले, आणि जोरदार घोषणाबाजी करून तुफान राडा झाला. पोलीस प्रशासनाचा मोठा बंदोबस्त असल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
आ. दत्तात्रय भरणे काय म्हणाले?
शरद पवार आणि अजित पवार गटामध्ये झालेल्या वादाबाबत इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी भाष्य केलं आहे. खासदार सुप्रिया सुळे आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांचे नाव घाई गडबडीत कोनशिलेवर लिहायचे राहिले आहे. ते आगामी काळात दुरुस्त करण्यात येईल, असे आमदार भरणे यांनी स्पष्ट केले आहे.