शिरूर : शिरूर तालुक्यातील कासारी येथील श्रीकृष्ण मंदिरात (महानुभव आश्रम) येऊन शिवीगाळ, दमदाटी करून आश्रमाच्या आवारातील भिंती जेसीबीने पाडून धार्मिक भावना दुखावल्याची घटना घडली आहे. ही घटना २७ एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास घडली. याप्रकरणी पाच जणांविरुद्ध शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सुदर्शन दत्तराजबाबा शिन्नरकर (रा. कासारी माळवाडी, ता. शिरुर) यांनी शिक्रापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून शामराव बबन फुलावरे, जयश्री शामराव फुलावरे, ऋषिकेश शामराव फुलावरे, चक्रधर रामभाऊ फुलावरे, सुनिल बाळू रासकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आश्रमातील दत्तराजबाबा सिन्नरकर आणि त्यांचे शिष्य श्रीकृष्ण मंदिरात प्रार्थना करत बसले होते. त्यावेळी शामराव फुलावरे, जयश्री फुलावरे, ॠषीकेश फुलावरे, चक्रधर फुलावरे हे सर्वजण आश्रमाच्या आवारात येऊन शिवीगाळ, दमदाटी करण्यास सुरुवात केली.
तसेच सुनिल बाळु रासकर हा आश्रमाच्या आवारात जेसीबी मशीन घेऊन आला. त्याने आश्रमाची संरक्षण भिंत, नारळ, कडुनिंब आणि इतर झाडे तसेच पिण्याच्या पाण्याच्या सिमेंटच्या टाक्या देखील जेसीबीच्या साहाय्याने पाडल्या. एवढचं नाही तर आश्रमाच्या आवारात मुरुम टाकून मागे शेतात जाण्यासाठी जबरदस्तीने रस्ता तयार केला. पुढील तपास शिक्रापूर पोलीस करत आहेत.
आरोपींना तातडीने अटक करा; नागरिक आक्रमक
दमदाटी व शिवीगाळ करुन आश्रमावरील महानुभव पंथाचा धर्मध्वज पाडून धर्माचा अपमान होईल असे कृत्य करून नुकसान केले. त्यामुळे महानुभव संप्रदायाच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे आरोपींना तातडीने अटक करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.